नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. परंतु काही मुद्यावरून प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम असल्याने सिडकोने त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद सुरू केला आहे. व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी बाप्पाच्या दर्शनाचे निमित्त साधत प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद सुरू केला आहे.विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पनवेल तालुक्यातील दहा गावे स्थलांतरित करावी लागणार आहेत. त्यामुळे या गावांतील साडेतीन हजार कुटुंबे निर्वासित होणार आहेत. त्यांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या या ग्रामस्थांना त्यांच्या मूळ बांधकाम क्षेत्राच्या तीन पट क्षेत्राचा भूखंड देण्यात येणार आहे. त्याची सोडत प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. पुढील सहा-सात महिन्यांत स्थलांतरित होणाऱ्या या बांधकामधारकांना प्रत्यक्ष भूखंडांचा ताबा देण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधितांनी भाडेतत्त्वावर स्वत:च्या निवासाची व्यवस्था करावी, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. स्थलांतरित होणाऱ्या ग्रामस्थांना १८ महिन्यांचे घरभाडे दिले जाणार आहे. परंतु शेवटची मागणी पूर्ण होइूपर्यंत स्थलांतर न करण्याची भूमिका काही प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. गावांचे स्थलांतर झाल्याशिवाय विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू करता येणार नाही. यापार्श्वभूमीवर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी आता प्रकल्पग्रस्तांशी थेट संवाद सुरू केला आहे. श्रीगणेशाची स्थापणा झाल्यानंतर मंगळवारपासून गगराणी यांनी स्थालांतर होणाऱ्या गावांचा दौरा सुरू केला आहे. एक गाव, एक गणपतीची परंपरा जोपासणाऱ्या कोपरा येथील गावाला भेट देवून त्यांनी तेथील ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. त्यानंतर चिंचपाडा व गणेशपुरी गावातील घरगुती व सार्वजनिक गणेशात्सवाला भेटी देवून बाप्पांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी ग्रामस्थ व त्यांच्या नेत्यांशी चर्चा केली. स्थालांतरला विरोध करण्यामागची त्यांची नक्की भूमिका काय ते समजून घेतली. शेवटची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत स्थलांतर करणार नाही, ही प्रकल्पग्रस्तांची मागणी अगदी अव्यवहार्य आहे. ही बाब विमानतळ प्रकल्पाला बाधक असल्याने प्रकल्पग्रस्तांनी कोठे तरी थांबण्याची गरज आहे. विमानतळ प्रकल्पाच्या हितासाठी प्रकल्पग्रस्तांनी दोन पावले टाकल्यास सिडको चार पावले पुढे टाकेल, असे आवाहन गगराणी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
बाप्पाच्या दर्शनातून विमानतळबाधितांशी संवाद
By admin | Published: September 11, 2016 2:30 AM