आंतरक्रीडा संकुल बनले गर्दुल्ल्यांचा अड्डा; सीबीडीमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 11:54 PM2019-10-27T23:54:24+5:302019-10-27T23:54:54+5:30
जुईनगरच्या क्रीडा संकुलामध्येही मद्यपींचा अड्डा; नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
योगेश पिंगळे
नवी मुंबई : महापालिकेने शहरात उभारलेल्या आंतरक्रीडा संकुलाची दुरवस्था होऊ लागली आहे. सीबीडीमधील संकुलामध्ये मद्यपींसह गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. बांधकाम होऊन दोन वर्षे झाल्यानंतरही त्याचा वापर केला जात नाही. जुईनगरमधील क्रीडा संकुलाचा परिसरही मद्यपींचा अड्डा बनला आहे. या प्रकाराकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. ४,०२० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेचे क्रीडा विभागाकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये पालिका क्रीडा व्हिजनची घोषणा करते. महापालिकेच्या सर्वसाधारणसभेमध्ये स्पर्धांमध्ये यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला जातो; परंतु खेळाडूंसाठी चांगले मैदाने, आंतरक्रीडा संकुल व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. सिडकोने महापालिकेकडे जवळपास ७३ मैदाने हस्तांतर केली आहेत. मैदानाचे अजूनही भूखंड हस्तांतर करून घेण्यासाठी पालिकेने पाठपुरावा सुरू केला आहे; परंतु जे भूखंड प्रत्यक्ष ताब्यात आहेत त्यांचा विकास करण्याकडे व तेथे स्टेडियम उभारण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. सद्यस्थितीमध्ये पालिकेकडे राजीव गांधी स्टेडियम हे एकच नियोजनबद्ध क्रीडा संकुल आहे. सीवूडमध्ये फुटबॉलसाठी मैदान विकसित केले आहे. या व्यतिरिक्त कुठेही खेळासाठी चांगल्या सुविधा नाहीत. महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये आंतरक्रीडा संकुल उभारण्याची घोषणा केली होती. सीबीडी, जुईनगर व वाशीमध्ये प्रत्यक्षात क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे समोर आले आहे.
सीबीडी सेक्टर ८ बी मधील वीर जवान मैदानामध्ये आंतरक्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. २७ आॅगस्ट २०१४ मध्ये प्रत्यक्ष बांधकाम करण्यात आले. एका वर्षात बांधकाम पूर्ण होऊन ते क्रीडाप्रेमींसाठी खुले होणे आवश्यक होते; परंतु प्रत्यक्षात त्याचे उद्घाटन फेब्रुवारी २०१८ मध्ये झाले. उद्घाटन होऊन दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला असून, अद्याप वापर केला जात नाही. इमारतीचे गेट व दरवाजे तुटले आहेत. या इमारतीचा वापर मद्यपी व अमली पदार्थ ओढणारे करू लागले आहेत. संपूर्ण इमारतीमध्ये मद्याच्या बॉटलचा ढीग तयार झाला आहे. या व्यतिरिक्त इतर अमली पदार्थ ओढून त्याचे कागद व इतर वस्तू इमारतीमध्ये सर्वत्र पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी जाण्यास परिसरातील नागरिकांना भीती वाटू लागली आहे. क्रीडा संकुलाची धर्मशाळा झाली असून, पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. जुईनगरमधील संकुलाचीही अशीच अवस्था झाली आहे. जुलै २०१७ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे क्रीडा संकुल चालविण्याची जबाबदारी एक संस्थेला दिली आहे; परंतु ते संकुल बंद अवस्थेमध्ये असते. या परिसरामध्येही रात्री मद्यपीचा अड्डा सुरू असतो.
कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ
महापालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून सीबीडी व जुईनगरमध्ये आंतरक्रीडा संकुल उभे केले आहे. उद्घाटन होऊन दोन व तीन वर्षे झाल्यानंतरही त्याचा अद्याप काहीही उपयोग केला जात नाही.
यामुळे हा खर्च व्यर्थ झाल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत. पालिका प्रशासनाविषयी असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
सीबीडीतील क्रीडांगणाची स्थिती
२७ ऑगस्ट २०१४ ला आंतरक्रीडा संकुलाचे भूमिपूजन
२७ फेब्रुवारी २०१८ मध्ये क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले.
इमारतीमध्ये मद्यपी व अमली पदार्थ ओढणाऱ्यांचा अड्डा तयार झाला आहे.
दरवाजे व गेट नसल्यामुळे इमारतीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे.
इमारतीमधील वस्तू व गेटची समाजकंटकांनी मोडतोड केली आहे.
इमारतीमध्ये चूल बनवून तेथे मद्यपी पार्ट्या करू लागले आहेत.
पाण्याची टाकी उघडी असून, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
इमारतीमध्ये सर्वत्र दारूच्या बॉटल, अमली पदार्थ ओढण्याचे साहित्य पडले आहे.