पनवेलच्या पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:05 AM2020-01-11T00:05:21+5:302020-01-11T00:05:45+5:30

पनवेलमधील प्रभाग क्रमांक १९ साठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार रुचिता लोंढे या विजयी झाल्या आहेत.

Interested in Panvel's by-election ruchita londhe win | पनवेलच्या पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे विजयी

पनवेलच्या पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे विजयी

googlenewsNext

पनवेल : पनवेलमधील प्रभाग क्रमांक १९ साठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार रुचिता लोंढे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी महाविकास आघाडीच्या स्वप्नल कुरघोडे यांचा पराभव केला.
गुरुवारी पार पडलेल्या मतदानावेळी केवळ ३१.३ टक्के मतदान झाले होते. सध्या सर्वत्र महाविकास आघाडीचे वारे असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे चुरशीची लढत रंगल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. मात्र, भाजपच्या उमेदवार रुचिता लोंढे यांना मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. ८,७९६ मतांपैकी रुचिता लोंढेंना ६,२३१ मते मिळाली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल कुरघोडे यांना २,३८७ मते मिळाली. १७८ मतदारांनी नोटाला पसंती दिली. या मतदारसंघात एकूण २८,३५० मतदार आहेत. यापैकी केवळ ८,७९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारांचा या मतदाना वेळी निरुत्साह दिसून आला. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर प्रथमच पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या रूपाने काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
आमदार प्रशांत ठाकूर प्रचारात जातीने लक्ष देऊन होते. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने मतदारांमध्येही लोंढे कुटुंबीयांबद्दल सहानुभूती होती. मतदारांनी ती मतदानातून दाखवून दिल्याचे या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले.
पनवेल महापालिकेत शिवसेनेचा एकही नगरसेवक नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिवसेनेला ही निवडणूक लढण्याची संधी दिली. या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना पनवेल महानगरपालिकेत आपले खाते उघडेल, अशी महाविकास आघाडीची धारणा होती.
>मतमोजणी केंद्राला
छावणीचे स्वरूप
मतदानाच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी शेकाप कार्यकर्त्या अविनाश मकासला मारहाण केल्याची घटना घडली. पनवेल शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात सभागृहनेते परेश ठाकूर व इतर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने या घटनेचे पडसाद मतमोजणी केंद्रावर उमटू नये म्हणून मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

Web Title: Interested in Panvel's by-election ruchita londhe win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.