इच्छुक अजूनही उमेदवारीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: May 1, 2017 06:53 AM2017-05-01T06:53:41+5:302017-05-01T06:53:41+5:30
महापालिकेच्या निवडणुकीमुळे पनवेल परिसरात प्रचाराचे जोरदार वारे वाहत आहेत. अजून एकाही पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी
मयूर तांबडे / पनवेल
महापालिकेच्या निवडणुकीमुळे पनवेल परिसरात प्रचाराचे जोरदार वारे वाहत आहेत. अजून एकाही पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र, तरीही इच्छुकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रविवार हा इच्छुक उमेदवारांसाठी सोनियाचा दिन ठरला आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा लावला आहे. इच्छुक उमेदवारांकडून सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तसेच फोटो शेअर केले जात आहेत. एक-दोन दिवसांत उमेदवारी निश्चित झाल्यावर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुराळा उडणार आहे. त्यानंतर नाराजी नाट्य, अपक्ष उमेदवारांची संख्या निश्चित होईल. सध्या तरी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार प्रचार यात्रेबरोबरच मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर देताना दिसत आहेत. तर काही इच्छुकांकडून स्वत: आणि विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या कामांची तुलना करून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शनिवार, रविवार आणि महाराष्ट्र दिन हा सुटीचा मुहूर्त साधून उमेदवारांनी प्रचारफेऱ्या काढून मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा धूमधडाका सुरू ठेवला आहे.
निवडणूक जाहीर होण्याआधीच निवडणुकांसाठी इच्छुकांच्या हालचालींनी वेग घेतला होता. अनेकांनी आपले प्रभाग निश्चत करून मतदारांच्या भेटी घेण्यासाठी दौरे सुरू केले. मात्र, आरक्षणामुळे काहींचा हिरमोड झाला. आता नव्या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक पक्षाचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत.
प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून त्यांच्याकडून अर्जही भरून घेतले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली नाही. उमेदवारी निश्चित समजून काही मातब्बर पुढाऱ्यांनी व्यक्तिगत प्रचार सुरू केला आहे. काही प्रभागात मतदारांचा कौल लक्षात घेऊन उमेदवार निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.
दुसऱ्या दिवशी पाच अर्ज दाखल
पनवेल : महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या रविवारच्या दुसऱ्या दिवशी एकूण पाच इच्छुकांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
पनवेल महापालिका निवडणूक प्रक्रि येसाठी मनपा हद्दीत प्रभागनिहाय सहा केंद्र तयार करण्यात आली आहेत. यात प्रभाग क्र मांक १,२,३ साठी रयत शिक्षण संस्थेचे नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज, प्रभाग ४, ५, ६ साठी खारघरमधील टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, प्रभाग ७, ८, ९, १० साठी कळंबोलीतील काळभैरव इमारत, प्रभाग ११, १२, १३ साठी कामोठे न्यू इंग्लिश स्कूल, प्रभाग १४, १५, १६ साठी पनवेलमधील के. व्ही. कन्या विद्यालय आणि प्रभाग १७, १८, १९, २० साठी कोएसोचे पनवेल येथील इंदूबाई वाजेकर माध्यमिक शाळा या केंद्रांचा समावेश आहे. यातील खारघरमधून १, तर कामोठे व पनवेलमधील पहिल्या केंद्रांतून प्रत्येकी दोन असे एकूण पाच अर्ज आले आहेत.
ऐनवेळी राजकीय पार्श्वभूमी अथवा निवडणुकींचा अनुभव नसलेल्या इच्छुकांनाही पक्षांकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, तरीही उमेदवारी मिळविण्यापासून ते प्रचारापर्यंत अनेक कसरती इच्छुकांना कराव्या लागणार आहेत. या सर्व गोष्टींसाठी अत्यंत कमी कालावधी असल्याने नवख्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. त्यामुळे त्या त्या पक्षांचे नेतेही उमेदवारी निश्चिती करताना मोठ्या तणावात व कोंडीत सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ चे मतदान २४ मे २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. हा दिवस जसजसा जवळ येईल, तसे उमेदवारांच्या प्रचार मोहिमेला वेग येत आहे. इच्छुक उमेदवार स्वत: घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेउन पदयात्रा काढत आहेत. प्रचार करताना निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.