अंतर्गत रस्त्यावरील पार्किंगचा ताप; वाहतूककोंडीची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:00 AM2019-10-28T00:00:43+5:302019-10-28T00:00:59+5:30
अवजड वाहनांचाही शिरकाव, अपघाताची शक्यता
नवी मुंबई : शहरात सध्या पार्किंगचा मुद्दा गंभीर बनला आहे. वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या अरुंद आणि निमुळत्या रस्त्यावर ट्रक, डम्पर तसेच ट्रेलरसारखी अवजड वाहनेही पार्क केली जात असल्याने त्याचा ताप सर्वसामान्य रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
नवी मुंबईतील पार्किंगचे नियोजन फसले आहे. यातच मागील काही वर्षांत शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. उद्योगधंदे वाढीस लागले आहेत, त्यामुळे वाहनांची संख्यासुद्धा वाढली आहे. त्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. जागा मिळेल तेथे मानमानी पद्धतीने वाहने उभी केली जात आहेत. प्रमुख रस्त्यांच्या कडेला दुतर्फा अशाप्रकारची बेकायदा पार्किंग दिसून येते.
प्रमुख रस्ते, पदपथ तसेच शहरातील सार्वजनिक जागा अपुऱ्या पडू लागल्याने आता वसाहतीअंतर्गतच्या अरुंद रस्त्यांवरही बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जातात. त्याचा फटका परिसरातील दळणवळण यंत्रणेला बसत आहे. निवासाच्या ठिकाणी किंवा इमारतीत पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने अंतर्गत रस्त्यावर रहिवासी आपली वाहने उभी करतात; परंतु आता त्यात अवजड वाहनांचीही भर पडू लागली आहे.
कोपरखैरणे परिसरातील बहुतांशी वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावर हे चित्र पाहावयास मिळते. विशेषत: कोपरखैरणेच्या खाडीकिनाºयालगतचा रस्ता, सेक्टर १९, सेक्टर १२ आदी परिसरातील रस्त्यावर सिलिंडरचे ट्रक, रसायनाने भरलेले टँकर आदी धोकादायक वाहने बेमालूमपणे पार्क केली जातात. मागील काही महिन्यांपासून अशा बेकायदा पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
महापालिकेची मोहीम ठप्प
रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफसफाई करणाºया सफाई कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाहनांचा अडथळा येत असल्याने रस्त्यांची योग्य पद्धतीने सफाई करता येत नाही. त्याचा ठपका संबंधित कर्मचाºयांवर ठेवला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मध्यंतरी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु महापालिकेची ही मोहीमही ठप्प पडली आहे.