नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत साकारण्यात येत असलेल्या विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांबरोबरच विस्तारित १८ होल्सचे आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्सही नवी मुंबईचे भूषण ठरेल, असा विश्वास राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सिडको मास्टर्स कप - २०२१ गोल्फ सामन्याचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोल्फ कोर्समध्ये विस्तार आणि आधुनिक सुविधांसह कंट्री क्लब विकसित करण्याच्या आराखड्यांचे अनावरण करण्यात आले. त्याप्रसंगी एकनाथ शिंदे बोलत होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना, कॉर्पोरेट पार्क आणि विस्तारित गोल्फ कोर्स हे राज्याच्याच नव्हे तर देशाच्या नगरविकास क्षेत्राला नवीन दिशा देणारे असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. गोल्फसारख्या प्रतिष्ठित खेळाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आयोजित करून राज्याच्या व देशाच्या पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सिडकोतर्फे खारघर नोडमध्ये ५२ हेक्टरवर खारघर व्हॅली गोल्फ कोर्स मैदान विकसित करण्यात आले आहे. गोल्फ कोर्समध्ये सिडकोचा मॅग्नम-ओपस गोल्फ व कंट्री क्लब, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ९ होल्सचे गोल्फ कोर्स यांचा समावेश होतो.
लवकरच ९ होल्सच्या गोल्फ कोर्सचा १८ होल्सच्या गोल्फ कोर्समध्ये विस्तार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्लब हाउससह पूर नियंत्रणासाठी डिटेन्शन पॉन्ड, निवासी वापरासाठी आलिशान व्हिला, पंचतारांकित उपाहारगृह, निवासी वापरासाठी अपार्टमेंट/बंगले विकसित करण्यात येणार आहेत. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, टेनिसपटू लिएंडर पेस आदी उपस्थित होते.