महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, वाशीत ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

By योगेश पिंगळे | Published: June 21, 2024 05:45 PM2024-06-21T17:45:06+5:302024-06-21T17:45:43+5:30

नवी मुंबई : ‘स्वत:साठी व समाजासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना ...

International Yoga Day was celebrated with enthusiasm by the Municipal Corporation, organizing a special program 'Yoga Mantra' in Vashi | महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, वाशीत ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

महापालिकेमार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा, वाशीत ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नवी मुंबई : ‘स्वत:साठी व समाजासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांनी वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे संपन्न झालेल्या ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत योग दिन उत्साहात साजरा केला. यावेळी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, माजी आयुक्त विजय नहाटा आदी मान्यवर उपस्थित होते.

             योगाभ्यासाचा नियमित अंगीकार केल्यामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येतात. त्यामुळे योगाचे महत्त्व ओळखून योगाभ्यास जनजागृतीसाठी दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो. महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने योगविषयक विविध उपक्रमांचे शालेय व खुल्या पातळीवर आयोजन केले जाते. अशाच प्रकारे सिडको एक्झिबिशन सेंटर येथील ‘योग मंत्रा’ या विशेष कार्यक्रमात योगाभ्यासाचे महत्त्व जनमाणसात प्रसारित होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने सहभागी होत या उपक्रमाच्या यशस्वितेत योगदान दिले.

या माध्यमातून ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’बाबत स्वच्छता संदेशाचाही प्रसार करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, विधी विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिलारे, समाज विकास विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ २चे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे, सहाआयुक्त सागर मोरे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, मदन वाघचौडे, शुभांगी दोडे, राजेश पवार, क्रीडाधिकारी रेवप्पा गुरव, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव, प्रशासकीय अधिकारी शंकर खाडे आदी अधिकारी, कर्मचारी यांनी योगप्रकार करीत आत्मिक शांती आणि समाधानाचा लाभ घेतला.

आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या जीवनशैलीत आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगसाधना ही अत्यंत महत्त्वाची असून, आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येकाने यापुढील काळात नियमित योग करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. शिंदे यांनी केले.
 

Web Title: International Yoga Day was celebrated with enthusiasm by the Municipal Corporation, organizing a special program 'Yoga Mantra' in Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.