International Yoga Day: वाशीत ‘वीरभद्रासन’चा होणार विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:22 AM2019-06-21T01:22:52+5:302019-06-21T01:23:03+5:30
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सिडकोच्या माध्यमातून भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सिडकोच्या माध्यमातून भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेने या शिबिरात अधिकाधिक योगसाधकांकडून तीन मिनिटांत ‘वीरभद्रासन’ करवून जागतिक विक्रम करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या शिबिराकडे योगसाधकांचे विशेष लक्ष लागले आहे. या शिबिरासाठी वाशीच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार २०१५ पासून प्रत्येक वर्षी २१ जून रोजी जगभरात योग शिबिराचे आयोजन करून योगाचा प्रचार केला जातो. प्राचीन भारतात योगविद्या हे शारीरिक व मानसिक स्वास्थ तसेच आत्मिक उन्नतीचे एक उच्च प्रतीचे साधन मानले गेले आहे. आजच्या धाकधुकीच्या व तणावाच्या जीवनात उत्तम आरोग्य व मानसिक स्वास्थ राखण्यासाठी योगसाधनेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार मागील तीन वर्षांत योगविद्येचा व्यापक प्रमाणात प्रचार करण्यात येत आहे. वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये या शिबिरासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकाच वेळी सुमारे पाच हजार नागरिक सहभागी होतील, या दृष्टीने येथे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पावसाचे दिवस असल्याने नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेतर्फे देशातील निवडक २२ ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून योगसाधनेचे धडे दिले जाणार आहेत. यात सलग तीन मिनिटे ‘वीरभद्रासन’च्या विश्वविक्रमांची गिनिज बुकात नोंद केली जाणार आहे. या २२ ठिकाणांत वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरचा समावेश आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार असून, नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
नवीन पनवेलमध्ये योग शिबिराचे आयोजन
पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. पनवेल परिसरातील नागरिकांना सामूहिक योगाभ्यास करता यावा या उद्देशाने नगरसेवक संतोष शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. सेक्टर-८ येथील गोकुळ डेरीसमोरील मैदानावर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्र माचे उद्घाटन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी महापौर कविता चौतमोल, उपमहापौर विक्र ांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर आदींसह पालिकेचे नगरसेवक, नवीन पनवेलमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत.