नवी मुंबई : सिडकोने आंतरराज्यीय बस टर्मिनलसाठी खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ पाच हेक्टरची जागा आरक्षित केली आहे. या प्रकल्पासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. सिडकोच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०१४ मध्ये जाहीर करण्यात आला होता; परंतु सिडकोच्या उदासीन धोरणामुळे मागील पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यापलीकडे या संदर्भात कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प कागदावरच सीमित राहिला आहे.
शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार नवी मुंबईची लोकसंख्या १७ लाख इतकी आहे; परंतु पायाभूत सुविधा विकसित करताना सिडकोने २०३१ पर्यंतच्या लोकसंख्येचा आधार घेतला आहे. त्यानुसार २०१३ मध्ये शहराची लोकसंख्या ४० लाखांच्या घरात जाईल, असा ढोबळ अंदाज वर्तविला जात आहे. तसेच पुढील २० वर्षांत जवळपास १४ लाख रोजगारनिर्मिती होईल, असा सिडकोचा अंदाज आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पुढील काळात रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण पडणार आहे. अशा परिस्थितीत परराज्यातून येणाऱ्या परिवहन सेवेच्या बसेसचे आतापासूनच सुयोग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने सिडकोने आंतरराज्यीय बस टर्मिनलचा प्रकल्प प्रस्तावित केला होता. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अर्थात पीपीटी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पात टर्मिनलची भव्य इमारत, कॅन्टीनची सुविधा, बसेससाठी क्यू आकाराचे शेल्टर्स, पार्किंग तसेच टॅक्सी आणि रिक्षांसाठी स्वतंत्र थांबा आदी सुविधा प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या बस टर्मिनलमध्ये सुमारे ३०० बसेस पार्क करण्याची सुविधा असणार आहेत.विशेष म्हणजे, सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी २०१४ मध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या प्रकल्पाची घोषणा केली होती.
महापालिकेचा रबाळेत पायलट प्रोजेक्टशहरात राहणाऱ्या विविध प्रांत व राज्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने परराज्यातील परिवहनच्या बसेससाठी अधिकृत थांबा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रबाळे येथे ही सुविधा सुरू निर्माण करण्याचे सूतोवाच महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी काही महिन्यांपूर्वी सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाशी बोलताना केले होते.
विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे नवी मुंबईची जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे. उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा, राष्ट्रीय व राज्य महामार्ग, अंतर्गत रस्त्यांचे जाळे, दळणवळणाच्या सुसज्ज सुविधा, रोजगारनिर्मिती आदीमुळे विविध राज्यांतील लोक नवी मुंबईकडे आकर्षित होऊ लागले आहेत, त्यामुळे मागील दहा वर्षांत परराज्यातून शहरात येणाºया परिवहन उपक्रमांच्या बसेसच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
या बसेसना अधिकृत थांबे नसल्याने सायन-पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, सीबीडी आणि कळंबोली आदी ठिकाणांहून प्रवासी घेतात. शहरात येणाऱ्या या प्रवाशांच्या दृष्टीने हे असुरक्षित व गैरसोयीचे असल्याने परराज्यातून येणाºया शासकीय उपक्रमांच्या बसेसना एक अत्याधुनिक दर्जाचे बस टर्मिनल निर्माण करावे, अशी रहिवाशांची मागणी आहे. त्यानुसार रबाळे उड्डाणपुलाखाली सध्या प्रायोगिक तत्त्वावर आंतरराज्यीय बस टर्मिनल सुरू करण्याची महापालिकेची योजना आहे.