इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात
By admin | Published: March 26, 2017 04:52 AM2017-03-26T04:52:31+5:302017-03-26T04:52:31+5:30
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे.
मयूर तांबडे / पनवेल
पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षांतर्गत इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरु वात केली आहे, तर काही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. पनवेलमध्ये खरी लढत शेकाप व भाजपामध्ये होणार असली तरी इतर पक्ष आपापले उमेदवार उभे करून टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहेत, तर मनसेने एकला चलोची भूमिका घेतलेली दिसत आहे.
रायगड जिल्ह्यातील पहिल्याच पनवेल महापालिकेची निवडणूक लवकरच होत आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी आपापल्या पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. साऱ्याच पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवार निवडताना पक्ष प्रमुखांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातच उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शेकाप व काँग्रेसमध्ये आघाडी झालेली आहे. या आघाडीत राष्ट्रवादीदेखील सामील झाली आहे. पनवेलमध्ये २००४ पासून रामशेठ ठाकूर विरुद्ध विवेक पाटील अशीच लढाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या महापालिकेच्या निवडणुकीत देखील ठाकूर विरु द्ध पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी पनवेल परिसरात सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याची एकही संधी उमेदवार सोडत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांत, रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या बॅनरबाजीतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात आघाडी झालेली आहे, तर शिवसेना व भाजपा यांच्यात युतीचे घोंगडे भिजत पडले आहे. मनसे स्वबळावर निवडणुका लढवण्यास सज्ज आहे. भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या तर त्याचा फायदा शेकाप आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेकापला सत्तेपासून रोखण्यासाठी भाजपा व शिवसेनेची युती व्हावी अशी काहींची इच्छा आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांत चुरस पाहावयास मिळणार आहे. पनवेलमध्ये कोण बाजी मारणार, यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे. निवडणुकीत अनेक जण पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज उमेदवारांमुळे पक्षाला बंडखोरीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दोन दिवस घेण्यात येणार आहेत. त्यानंतरच उमेदवार निश्चित करण्यात येणार येईल. सध्या पक्षाकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे.
- प्रशांत ठाकूर,
आमदार, भाजपा
इच्छुक कार्यकर्त्यांची नावे आलेली आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून कार्यकर्त्यांना बोलावतो, त्यांच्याशी चर्चा करूनच उमेदवार ठरविण्यात येणार आहे. आघाडीशी बोलून याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुढील आठवड्यात सुरू होतील.
- बाळाराम पाटील,
आमदार, शेकाप
इच्छुकांचे अर्ज आलेले आहेत. ७० ते ८० इच्छुकांचे अर्ज आले आहेत. हे अर्ज पक्षाकडे पाठविणार आहोत. पुढच्या आठवड्यात मुलाखतीसाठी नितीन सरदेसाई यांच्याशी चर्चा करणार आहोत. सध्यातरी स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.
- अतुल चव्हाण,
उपजिल्हाध्यक्ष, मनसे
येत्या दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरु वात होईल. ४७ इच्छुक उमेदवारांची मीटिंग सुनील तटकरे यांच्यासोबत झालेली आहे. शेकाप काँग्रेससोबत आघाडी असल्यामुळे १४ ते १६ जागा मिळाव्यात, अशी मागणी आहे.
- सुनील घरत,
तालुकाध्यक्ष,
राष्ट्रवादी
उमेदवारांच्या मुलाखती घेतानाच जिंकून येणारा उमेदवार निवडला जाणार आहे. शेकाप व राष्ट्रवादीसोबत आघाडी असल्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे ठरल्यानंतरच उमेदवार निश्चित करणार आहोत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना उमेदवार कसे आहेत, हे पाहणे गरजेचे आहे.
- आर.सी घरत, काँग्रेस, जिल्हाध्यक्ष