कर्करोगाच्या उपचारांसाठी 'आरएनटी' थेरेपी सादर, नवीन उपचारात्मक पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 04:00 PM2023-04-11T16:00:23+5:302023-04-11T16:00:47+5:30
कर्करोगाच्या बहुकुशल व्यवस्थापनातील नवीन उपचारात्मक पर्याय म्हणून रेडिओन्यूक्लाइड थेरपी (आरएनटी)कडे पाहता येईल, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो.
नवी मुंबई : नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आयोजित केलेल्या परिषदेत थायरॉइड कर्करोगाच्या उपचारासाठी ऍडव्हान्स्ड (प्रगत) आयसोटोप रेडिओन्यूक्लाइड थेरेपीचा शुभारंभ केला आहे. कर्करोगाच्या बहुकुशल व्यवस्थापनातील नवीन उपचारात्मक पर्याय म्हणून रेडिओन्यूक्लाइड थेरपी (आरएनटी)कडे पाहता येईल, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो. ही एक कमीतकमी वेदनादायक प्रक्रिया आहे आणि भोवतालच्या निरोगी ऊर्तींना हानी न पोहचवता कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करुन नष्ट केले जाते, आरएनटीचा वापर दोन्ही घातक कर्करोग आणि काही गैर-कर्करोगजन्य स्थितींवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. अनिल डी'क्रूझ म्हणाले, "रेडिओन्यूक्लाइड आधारित थेरेपी यासारख्या लक्ष्यित थेरेपी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान असून कीमोथेरेपीप्रमाणे रक्तप्रवाहात प्रवास करुन संपूर्ण शरीरातील पेशींपर्यंत पोहोचते. तथापि कीमोथेरेपीच्या विपरित रेडिओऍक्टिव्ह सबस्टॅन्सेस (किरणोत्सर्गी पदार्थ) केवळ रोगग्रस्त पेशींनाच लक्ष्य करतात आणि यामुळे संभाव्य दुष्परिणाम कमी होतात. कमीतकमी दुष्परिणाम होऊन कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करुन आणि नष्ट करुन यकृताचा कर्करोग, थायरॉइड कर्करोग, प्रोस्टेट (मूत्राशयासंबंधी) कर्करोग आणि न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर यासह विविध प्रकारच्या कर्करोगांवर हा प्रभावी उपचार ठरु शकतो."
डॉ. आनंद झाडे म्हणाले की, "वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कर्करोगाच्या नवीन उपचारांच्या विकासामध्ये आणि उपलब्धतेमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. रेडिओन्यूक्लाइड थेरेपी कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक सामर्थ्यशाली साधन म्हणून उदयास आली आहे आणि जिचा वापर विविध मार्गांनी केला जाऊ शकतो, ज्यामध्ये किरणोत्सर्गी औषधे इंजेक्षनद्वारे शिरेच्या आत देणे किंवा कर्करोगाच्या जागी थेट किरणोत्सर्गी सामग्री ठेवणे अशा मार्गांचा समावेश आहे. त्यानंतर कर्करोगाच्या पेशींद्वारे रेडिएशन शोषून घेतले जाते आणि त्या पेशींचा नाश होतो."
याचबरोबर, "प्रगत आयसोटोप रेडिओन्यूक्लाइड थेरेपीचा शुभारंभ कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील एक मोठे पाऊल ठरले आहे. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक आशेचा किरण मिळाला आहे. या अत्याधुनिक उपचारात्मक प्रक्रियांमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा आणि उपचार मिळू शकतील तसेच शक्य असलेले सर्व उपचार करुन कर्करोगाच्या लढाईतील सीमा विस्तारण्यास आम्हाला मदत होणार आहे. नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर केअर सेंटर्समध्ये सर्व प्रकारची सर्वसमावेशक उपचार पद्धती प्रदान केली जाते, ज्यामध्ये विशिष्ट अवयवासंबंधीचे (ऑर्गन स्पेसिफिक) वरिष्ठ सल्लागार, दा विंची रोबोटिक्ससह नवीनतम तंत्रज्ञान, रिहॅब (रोगमुक्तता) सेवा आणि अत्यंत प्रगत क्रिटिकल केअर युनिट यांचा समावेश आहे", असे संतोष मराठे म्हणाले.