घुसखोर महिलेला सहा महिने कारावास; न्यायालयाने सुनावली शिक्षा
By सूर्यकांत वाघमारे | Published: November 2, 2023 06:47 PM2023-11-02T18:47:43+5:302023-11-02T18:47:46+5:30
बनावट व्हिजा वापरून करत होती वास्तव्य
नवी मुंबई : बनावट व्हिजा वापरून वास्तव्य करणाऱ्या विदेशी महिलेवर पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात कारवाई केली होती. न्यायालयाने तिला सहा महिन्यांची शिक्षा व एक हजार रुपयांचा दंड सुनावलं आहे. तर कारावास भोगल्यानंतर तिला युगांडा या तिच्या मूळ देशात हद्दपार केले जाणार आहे.
तळोजा परिसरात राहणाऱ्या विदेशी महिलेकडे भारतात वास्तव्याची बनावट कागदपत्रे असल्याचे विशेष शाखेच्या सतर्कतेमुळे समोर आले होते. त्यानुसार तळोजाचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गोरे, विशेष शाखेचे निरीक्षक विशाल माने यांच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात या महिलेवर कारवाई केली होती. मूळच्या युगांडाच्या राहणाऱ्या या महिलेने दुसऱ्या व्यक्तीच्या व्हिजाच्या प्रतीमध्ये स्वतःची माहिती भरून तो व्हिजा मूळ असल्याचे भासवून नवी मुंबई पोलिसांकडे जमा केला होता. परंतु तिची चलाखी विशेष शाखा पोलिसांच्या लक्षात येताच तिला अटक करण्यात आली. तिच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पनवेल न्यालयालयात तिच्यावर दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते. त्यावर २७ ऑक्टोबरला अंतिम सुनावणी झाली असता सरकारी वकील जयश्री कुलकर्णी यांनी मांडलेल्या सबळ पुराव्या आधारे न्यायाधीशांनी सदर विदेशी महिलेला ६ महिने कारावास व १ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.