नवी मुंबई : शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळावा, यासाठी शासनाकडून संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्याच्या सूचना महानगरपालिका आणि नगरपालिकांना करण्यात आाल्या. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या अभियानांतर्गत आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी आठवडे बाजार भरविला जातो. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, धंद्यासाठी स्थानिक विक्रेत्यांनी या जागेवर अतिक्रमण केले आहे. हे विक्रेते या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांशी अरेरावी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.सीबीडी सेक्टर १ परिसरातील सुनील गावस्कर मैदानात दर शनिवारी भरणाऱ्या बाजारातील मुख्य प्रवेशाच्या ठिकाणीच स्थानिक भाजी, फळविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून येते. खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना हा माल थेट शेतातून आणल्याचे सांगत, मालाचा खप करण्यासाठी शेतकऱ्यांआधी हजेरी लावली जाते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रात शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. बेलापूर परिसरात १५ ते २० शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल्स उभारले आहेत. ‘शेतातून शेतमाल थेट घरामध्ये’ या उद्देशाने हा आठवडे बाजार भरविला जात असून, स्थानिक विक्रेत्यांकडून मात्र दादागिरी केली जाते. शेकऱ्यांच्या स्टॉलपुढेच स्थानिक भाजी, फळविक्रेते माल घेऊन बसत असल्याने मनजोगा धंदा करता येत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने पुढील आठवड्यापासून माल विक्रीस येणार नसल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आठवडे बाजारात स्थानिक विक्रेत्यांची घुसखोरी
By admin | Published: January 10, 2017 6:52 AM