कोकण भवनात बाहेरील वाहनांची घुसखोरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By योगेश पिंगळे | Published: March 21, 2024 04:24 PM2024-03-21T16:24:46+5:302024-03-21T16:25:00+5:30
सुरक्षेच्यादृष्टीने शासकीय वाहने आणि कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहनांच्या प्रवेशासाठी स्टिकर देण्यात आले आहेत. परंतु स्टिकर नसलेल्या बाहेरील वाहनांची घुसखोरी होत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवी मुंबई : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनाच्या इमारतीमध्ये शासनाच्या विविध विभागांची कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त नागरिकांचीदेखील मोठी वर्दळ असते. सुरक्षेच्यादृष्टीने शासकीय वाहने आणि कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहनांच्या प्रवेशासाठी स्टिकर देण्यात आले आहेत. परंतु स्टिकर नसलेल्या बाहेरील वाहनांची घुसखोरी होत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सीबीडीतील कोकण भवन या इमारतीमध्ये शासनाच्या विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण आयुक्त राज्य गुप्तचर विभाग, माहिती उपसंचालक, विक्रीकर, महसूल खाते, जातपडताळणी, आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग अशा विविध विभागाची कार्यालये आहेत. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील महसूलविषयक कामे या ठिकाणाहून केली जातात. कोकण भवनमध्ये कामानिमित्ताने शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यासह नागरिकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.
कोकण भवन परिसरातील वाहने पार्किंगची जागा अपुरी पडू लागल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने १४ ऑगस्ट २०२३ पासून शासकीय वाहने आणि कोकण भवनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांच्या प्रवेशासाठी कार्यालयाकडून स्टिकर देण्यात आले आहेत. यामुळे कोकण भवनच्या आवारात स्टिकरधारक वाहनांची वर्दळ असणे आवश्यक आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करून अनेक स्टिकर नसलेल्या वाहनांची ये-जा सुरू असते. तसेच पार्किंग क्षेत्रात अशी वाहने उभी असतात. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रवेशद्वारातून वाहने सोडताना सुरक्षा रक्षकांच्या माध्यमातून भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी उपआयुक्त प्रशासन अमोल यादव यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.