अवैध माल वाहतूक करणारे डंपर सुसाट
By admin | Published: May 1, 2017 06:29 AM2017-05-01T06:29:53+5:302017-05-01T06:29:53+5:30
वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबईत
कमलाकर कांबळे / नवी मुंबई
वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहेत; परंतु नवी मुंबईत या नियमाला सपशेल हरताळ फासला गेला आहे. विशेषत: रेती आणि खडीची वाहतूक करणाऱ्या डंपरमालकांनी या नियमाला केराची टोपली दाखविली आहे. या प्रकाराला प्रादेशिक उपपरिवहन कार्यालयाचा (आरटीओ) अर्थपूर्ण पाठिंबा मिळत असल्याने हे डंपरचालक सुसाट सुटल्याचे दिसून येते.
सुरक्षिततेच्या दृष्टीने क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्यास मनाई आहे. तसे उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेल्याने वाहनाचे नुकसान होते. तसेच अपघाताची शक्यता वाढते. अधिक माल भरल्याने अनेकदा मोठे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्वभूमीवर मालवाहू वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करण्याचे स्पष्ट निर्बंध आहेत. नवी मुंबईत तर वाहतूकदारांनी हे निर्बंध साफ धुडकावून लावले
आहेत.
नवी मुंबईतून मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात खडी व क्रश सॅण्डची वाहतूक केली जाते. नियमानुसार एका डंपरमधून १५ टन माल वाहून नेण्याची मुभा आहे. प्रत्यक्षात मात्र ३0 ते ४0 टन इतका माल वाहून नेला जातो. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओकडून कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु संबंधित विभागानेही अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने दिवसेंदिवस या अवैध वाहतुकीला चालना मिळताना दिसत आहे.
दरम्यान, नवी मुंबईचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी या प्रकाराचा इन्कार केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तातडीने कारवाई केली जाते. त्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रात क्षमतेपेक्षा अधिक खडी व कॅ्रश सॅण्डची वाहतूक करणारा आतापर्यंत एकही डंपर आढळला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. असे असले तरी यासंदर्भात अधिक चौकशी करून दोषी आढळणाऱ्या डंपरवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
दिवसाला ४000 फेऱ्या
मुंबईच्या विविध उपनगरांत नवी मुंबईतील पनवेल, उरण परिसरातून खडी आणि क्रश सॅण्डची वाहतूक केली जाते. त्यासाठी जवळपास दीड हजार डंपर दिवस-रात्र चालतात. एक डंपर दिवसाला किमान दोन फेऱ्या मारतो. त्यानुसार दिवसाला जवळपास चार हजार फेऱ्या होतात. विशेष म्हणजे डंपरमध्ये क्षमतेपेक्षा ३0 ते ४0 टन अधिक माल भरल्याचे दिसून येते.
वसुलीसाठी दलालांची नियुक्ती
डंपरमधून क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेण्यासाठी डंपरचालकांकडून बेकायदा वसुली केली जाते. सूत्राच्या माहितीनुसार प्रत्येक डंपरमागे महिन्याला १७,५00 रुपयांचा हप्ता द्यावा लागतो. हप्ता वसुलीसाठी दलालांची नेमणूक करण्यात आली आहे. या दलालांकडे माल घेऊन मुंबईत जाणाऱ्या प्रत्येक डंपरचा क्रमांक असतो. प्रत्येक महिन्याच्या १ ते १0 तारखेपर्यंत हप्त्याची रक्कम जमा करणे गरजेचे असते. हप्ता दिलेल्या डंपरला तपासणी न करता सोडून दिले जाते. तर हप्त्याची रक्कम न आलेल्या डंपरला अडवून दंडात्मक कारवाई केली जाते, अशी माहिती सूत्राने दिली.
गोळा होणाऱ्या रकमेची विभागणी?
सध्या पनवेल येथील गव्हाण कोपरा, जासई आणि कुंडे वाडा येथून खडी आणि क्रश सॅण्डची मुंबई उपनगरात वाहतूक केली जाते.
आरटीओचा वरदहस्त असल्याने बहुतांशी डंपरमधून क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक केली जाते.
त्यासाठी दलालांच्या माध्यमातून गोळा केल्या जाणाऱ्या हप्त्याची रक्कम पेण, पनवेल, नवी मुंबई, वडाळा, अंधेरी व बोरीवली या आरटीओतील संबंधित अधिकाऱ्यांना विभागून दिली जाते, अशी धक्कादायक माहिती सूत्राने दिली आहे.