एपीएमसी वाहतूक चौकीसमोर अवैध पार्किंग
By admin | Published: May 16, 2017 12:54 AM2017-05-16T00:54:16+5:302017-05-16T00:54:16+5:30
एपीएमसी वाहतूक चौकीपासून माथाडी भवनपर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे; परंतु येथील बसस्टॉपासून सर्व्हिस रोडवरही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : एपीएमसी वाहतूक चौकीपासून माथाडी भवनपर्यंत नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे; परंतु येथील बसस्टॉपासून सर्व्हिस रोडवरही अवैधपणे खासगी वाहने उभी केली जात असून, वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबईमधील वाहतुकीची सर्वात गंभीर समस्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात निर्माण झाली आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यामध्ये व बेशिस्तपणा थांबविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करणारे व मार्केटमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या ट्रक, टेम्पोचालकांची पिळवणूक करणारे वाहतूक पोलीस रोडवरील अवैध पार्किंगकडे पूर्णपणे दुर्र्लक्ष करत आहेत. पोलीस चौकीला लागून असलेल्या बसथांब्यासमोर खासगी कार उभ्या करण्यात येत आहेत. बसथांब्यापासून ते माथाडी भवनपर्यंतचा रोड व सर्व्हिस रोडवर नो पार्किंगचे बोर्ड लावले आहेत; परंतु पोलिसांचे आदेश धाब्यावर बसवून मुख्य रोड व सर्व्हिस रोडवरही खासगी वाहने उभी केली जात आहेत. नागरिकांनी तक्रारी करूनही पोलीस याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
एपीएमसी वाहतूक पोलिसांनाच शिस्त लावण्याची वेळ आली आहे. वाहतुकीच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. चौकीसमोरील अवैध पार्किंग थांबविता येत नसल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. येथील अवैध पार्किंगविषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी चित्रीकरण करून व छायाचित्र काढून त्याच्या तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिसांवरच कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.