वाहतूककोंडी टाळण्यासाठी उलटा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 01:19 AM2019-04-05T01:19:46+5:302019-04-05T01:20:09+5:30

खारघर टोलनाक्यावरील प्रकार : प्रश्न सोडविण्याकडे टोल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष; अपघाताची शक्यता वाढली

Invert Travel to Avoid Transportation | वाहतूककोंडी टाळण्यासाठी उलटा प्रवास

वाहतूककोंडी टाळण्यासाठी उलटा प्रवास

googlenewsNext

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्यावर रोज पहाटे वाहतूककोंडी होत आहे. रखडपट्टी टाळण्यासाठी उलट दिशेने वाहने चालविली जात असून, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या समस्येकडे टोल व्यवस्थापनही दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

खारघर टोलनाक्यावरील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. टोल वसुली करणाऱ्या ठेकेदाराच्या नियुक्तीचा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला होता. या सर्वांचा परिणाम येथील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे. रोज सकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान वाहनांची गर्दी असते. मुंबई, नवी मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. ठाणे- बेलापूर एमआयडीसीमधील आयटी सेंटरमधील अनेक तरुण पनवेल परिसरामध्ये राहात आहेत. त्यांना घेऊन जाणारी वाहनेही सकाळीच नवी मुंबईकडे येत असतात. अवजड वाहनेही मोठ्या प्रमाणात मार्गावरून येत असतात. अवजड वाहनांसाठीची लेन ठरलेली असते; पण टोलनाक्यावर सर्वच लेनमधून अवजड वाहने जातात. यामुळे पनवेलच्या दिशेला वाहनांची रांग लागलेली असते. अनेक वेळा अर्धा तास येथे रखडावे लागत असल्यामुळे अनेक कार चालक विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जातात. विरुद्ध दिशेने जाणाºया वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वेळेत हा प्रकार थांबविला नाही तर अपघाताची शक्यता आहे.

टोलनाक्यावर रोज सकाळी वाहतूककोंडी होत आहे. वाहनांच्या रांगा वाढल्या की व्यवस्थापनाने काही वाहने टोल न घेता सोडणे आवश्यक आहे. याशिवाय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी दुभाजक मोकळे केले असल्यामुळे वाहनांना विरुद्ध दिशेला जाता येते. वास्तविक ज्या ठिकाणावरून वाहने विरुद्ध दिशेला जातात त्या ठिकाणी रस्ता दुरुस्त करणाºया ठेकेदारानेही योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये कोणत्याच उपाययोजना होताना दिसत नाहीत. वाहतूक पोलिसांनी यापूर्वीही वारंवार टोल व्यवस्थापनास याविषयी माहिती दिली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत. अनेक वेळा विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर कारवाईही केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागालाही याविषयी सूचना दिल्या आहेत; पण संबंधित विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात नसल्याने ही समस्या गंभीर होत चालली आहे. टोल वसुलीसाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली असून त्यांनाही पोलिसांनी याविषयी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पहाटेची स्थिती गंभीर
पहाटे महामार्गावरून वाहने वेगाने जात असतात. ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाºया मार्गिकेवरून उलट दिशेने शेकडो कार व इतर वाहने नवी मुंबईकडे येत असतात. उलट्या प्रवासामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

टोलसाठी नवीन व्यवस्थापन
खारघर टोल वसुलीसाठी दोन दिवसांपासून नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. यामुळे नवीन व्यवस्थापनास अद्याप किती रांगा लागल्यानंतर वाहने टोल न घेता सोडून दिली जावी याविषयीही सूचना नाहीत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करतानाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

महामार्गावरून उलट्या दिशेने वाहने चालविणे धोकादायक आहे. टोलवर पहाटे होणारी गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश टोल व्यवस्थापनास दिले आहेत. त्यांना याविषयी लेखी पत्रही दिले जाणार आहे.
- प्रवीण पांडे,
पोलीस निरीक्षक,
वाहतूक

रोज पहाटे टोलनाक्यावर वाहतूककोंडी होत असल्यामुळे कामावर जाण्यास विलंब होत आहे. विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात वाहने चालविली जात असून अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याविषयी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात.
- सुरेश कारकिले, रहिवासी, पनवेल
 

Web Title: Invert Travel to Avoid Transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.