नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील अभियांत्रिकी विभागातील बदल्या आणि बढत्यांबाबत आरटीआय कार्यकर्त्यांनी आधीच आक्षेप घेतलेला असताना आता राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून शहर अभियंता विभागाच्या एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२४ या काळातील कामकाजाची चौकशी व विशेष लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल विधिमंडळ पटलावर सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुधीर ज्ञानदेव पवार यांच्या निवेदनास अनुसरून वडेट्टीवार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. यात प्रामुख्याने शहर अभियंता हे पद एप्रिल २०२१ पासून रिक्त असून त्या जागी कार्यकारी अभियंता संजय देसाई यांना अतिरिक्त कार्यभार दिला आहे. अतिरिक्त कारभार सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ ठेवता येत नाही. यामुळे यात तातडीने हस्तक्षेप करून शहर अभियंता हे पद तत्काळ भरण्याची कार्यवाही करावी, तसेच एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२४ या काळातील कामकाजाची चौकशी करून विशेष लेखापरीक्षण करावे, असे वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.