लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ मध्ये संरक्षण भिंत बांधताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून येथील मातीचीही अवैधपणे वाहतूक करण्यात आली असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली असून याविषयी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.बेलापूरमध्ये पावसाळ्यात डोंगराचा काही भाग खचून कल्पतरू सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली होती. पावसाचे पाणी व रेती इमारतीच्या आवारात शिरले होते. सदर ठिकाणी महानगरपालिकेने संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. संरक्षण भिंत बांधताना डोंगर उतारावरील अनेक वृक्ष तोडण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. उतारावरील माती डम्परमध्ये भरून इतर ठिकाणी नेण्यात आली आहे. माती इतर ठिकाणी घेऊन जाण्यास रहिवाशांनी विरोध केला आहे. निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यात यावा. वृक्षतोड व माती वाहतुकीची चौकशी करण्यात यावी. नियमबाह्यपणे काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याविषयी पत्रव्यवहार सुरू केला आहे.
वृक्षतोडीसह माती उत्खननाची चौकशी करा; सीबीडीतील रहिवाशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 11:43 PM