गुन्ह्यांचा तपास मंदावला; गुन्ह्यात १४.३३ टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:10 AM2019-01-31T00:10:56+5:302019-01-31T00:11:09+5:30
वर्षभरात ५५१५ गुन्हे; दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट
नवी मुंबई : गतवर्षी नवी मुंबईत छोटे-मोठे ५५१५ गुन्हे घडले असून त्यापैकी ३६३६ गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून होऊ शकलेली आहे. गुन्हे प्रकटीकरणाचे हे प्रमाण २०१७ च्या तुलनेत पाच टक्क्याने कमी आहे. मात्र चालू वर्षात गुन्हे प्रकटीकरणासह दोषसिद्धीकडे तपास पथकांकडून बारकाईने लक्ष दिले जाणार असल्याची हमी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिली आहे.
नवी मुंबईचे वाढते शहरीकरण व अनियंत्रित लोकसंख्या यामुळे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातले गुन्हेगारीचे देखील प्रमाण वाढत चालले आहे. मागील पाच वर्षाच्या तुलनेत २०१८ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ५५१५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३६३६ गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली आहे. उर्वरित गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसल्याने गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण देखील २०१७ च्या तुलनेत पाच टक्क्याने घसरून ६५.९ टक्के झाले आहे. याबाबत दिलगिरी व्यक्त करत चालू वर्षात पोलीस आपली कार्यक्षमता सिद्ध करून दाखवतील असा विश्वास पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. गतवर्षात उघड झालेल्या गुन्ह्यांमध्ये सिरीयल रेपिस्ट रेहान कुरेशीद्वारे झालेल्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. गेली दहा वर्षे तो मुंबई पोलिसांपासून ते सीआयडीपर्यंत सर्वांनाच गुंगारा देत होता. मात्र नवी मुंबई पोलिसांनी त्याला शिताफीने अटक करून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या २० गुन्ह्यांची उकल केली. त्यात दोन हत्येच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. मात्र वाहनचोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांवर मागील दोन वर्षात अपेक्षित असे नियंत्रण नवी मुंबई पोलीस मिळवू शकलेले नाहीत. उलट, त्यावर पडदा टाकण्याच्या उद्देशाने घडलेल्या गुन्ह्यांची नोंद टाळण्याचे प्रकार दोन वर्षापूर्वी घडत होते. विद्यमान पोलीस आयुक्तांनी या कार्यपद्धतीत बदल घडवून गुन्हे दडपण्याऐवजी त्यांची उकल करण्यावर भर दिला आहे. तर उघड झालेल्या गुन्ह्यांची न्यायालयात दोषसिद्धीचेही प्रमाण २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये दोन टक्क्याने कमी झाले आहे. गतवर्षी रस्त्यांची दुरवस्था व हयगयीने वाहन चालवल्याने अपघातांमध्ये ३०० जणांचा मृत्यू झाला आहे.
गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून मागील काही महिन्यात अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यानंतरही नागरिकांकडून स्वत:सह वाहनांच्या सुरक्षेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे पहायला मिळत आहे. यामुळे अपघातांची मालिका कशी थांबवता येईल यासाठी पोलीस विशेष प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी १३ हजार २१० अर्ज नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १२०९ अर्ज प्रलंबित असून उर्वरित निकाली काढल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त तुषार दोषी, राजेश बनसोडे, पंकज डहाणे आदी उपस्थित होते. रस्त्यांवर उभी असणारी बेवारस वाहने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे. अशा २४४ वाहनांच्या मालकांचा आरटीओमार्फत शोध घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
पासपोर्ट व्हेरिफिकेशनला गती
गतवर्षात पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे ६३ हजार ८७१ अर्ज पोलीस आयुक्तालयातून निकाली काढण्यात आले आहेत. पासपोर्टसाठी आवश्यक पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया जलद करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. त्याकरिता अर्जदाराच्या घरी जाऊन जागीच टॅबद्वारे फोटो काढून आॅनलाइन प्रक्रिया केल्या जात आहेत. त्यानुसार २१ दिवसांच्या आत प्रक्रिया उरकल्याचे प्रमाण ६० टक्के असून ते अधिक वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे.
सागरी सुरक्षेवर भर
नवी मुंबईला सुमारे १४४ कि.मी. लांबीचा सागरी व खाडी किनारा लाभला आहे. मुंबईवरील आतंकी हल्ल्यानंतर नवी मुंबईच्याही सागरी सुरक्षेवर लक्ष दिले जात आहे. मात्र सद्यस्थितीला नवी मुंबई पोलिसांकडील ७ बोटीपैकी एक बोट नादुरुस्त असल्याने दोन खासगी बोटींची मदत पोलिसांना घ्यावी लागत आहे.
अवैध शस्त्राचे पंधरा गुन्हे
अवैधरीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गतवर्षात १५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अठरा जणांना अटक झाली असून त्यांच्याकडून ९ गावठी कट्टे, ६ पिस्तूल व एक कार्बाईन जप्त केली आहे. सुमारे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे.
ई-चलानचे ३८७८ गुन्हे
वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्त लावण्यासाठी ई-चलानद्वारे कारवाईवर भर दिला जात आहे. त्यानुसार पूर्वी मुख्य मार्गांवर होणारी ही कारवाई विभागाअंतर्गतच्या रस्त्यांवर देखील केली जात आहे. त्यानुसार गतवर्षात ३८७८ ई-चलानच्या कारवाया करून ६ लाख २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
७५ सायबर गुन्हे
सायबर सेलकडे गतवर्षी ७५ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी २७ गुन्हे उघड झाले आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये डेबिट/ क्रेडिट कार्ड फ्रॉड, सोशल मीडियाद्वारे फसवणूक, कंपनीची माहिती चोरणे, लॉटरीच्या बहाण्याने फसवणूक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
११ पैकी १० दरोडे उघड
गतवर्षी घडलेल्या दरोड्याच्या ११ गुन्ह्यांपैकी १० गुन्ह्यांची उकल झालेली आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी ३० टक्के मुद्देमाल गुन्हेगारांकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये चेन स्रॅचिंगच्या गुन्ह्यातील ५३ टक्के, जबरी चोरीमधील ६१ टक्के, चोरीतील २८ टक्के व दरोड्यातील ६९ टक्के मुद्देमाल आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना फेब्रुवारीच्या महिन्यात परत दिला जाणार आहे.