नवी मुंबईमध्ये एक लाख नागरिकांची तपासणी पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 01:24 AM2020-08-20T01:24:10+5:302020-08-20T01:24:29+5:30
आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली असून, यामध्ये अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे.
नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने मिशन ब्रेक द चेन मोहीम सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून जास्तीतजास्त चाचण्या घेण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली असून, यामध्ये अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. शहरात २२ ठिकाणी ही तपासणी केंद्र सुरू केली आहेत.
नवी मुंबई कोरोनामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने दीर्घकालीन नियोजन केले आहे. जास्तीतजास्त नागरिकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळली, तरीही तत्काळ अँटिजेन चाचणी केली जात आहे. रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. कोणत्याही स्थितीत चाचणी करण्यास टाळाटाळ करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आयुक्तांनी पदभार स्वीकारला, तेव्हा एकूण चाचण्यांची संख्या २७,२४९ झाली होती. सद्यस्थितीमध्ये ही संख्या एक लाखापेक्षा जास्त झाली आहे. एक महिन्यात ७० हजारपेक्षा जास्त तपासण्या केल्या असून, त्यात अँटिजेन चाचण्यांची संख्या सर्वाधिक आहे. महानगरपालिकेने २२ ठिकाणी अँटिजेन तपासणी केंद्र सुरू केली आहेत. याशिवाय कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. आता ‘अँटिजेन टेस्ट आपल्या घरापर्यंत’ ही संकल्पना पालिका राबवत असून, यासाठी ‘मिशन झीरो नवी मुंबई’ उपक्रम हाती घेण्यात आला. या अंतर्गत ६ जनजागृतीपर प्रचाररथ आणि ३४ मोबाइल अँटिजेन टेस्टिंग व्हॅन कार्यान्वित करण्यात आल्या आणि सोसायटी, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्ट्स सुरू केल्या आहेत.
या चाचणीत ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये लक्षणे आढळत आहेत, त्यांची लगेच आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. याशिवाय बाधित व्यक्तीच्या अतिनिकटच्या संपर्कातील व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व किडनीचे विकार असे आजार असणाºया कोमॉर्बिड व्यक्तींचीही आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींची टेस्ट केल्यानंतर त्या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होईपर्यंत त्यांचे विलगीकरण केले जाते आहे. महानगरपालिकेने स्वत:ची प्रतिदिन १,००० टेस्टिंग क्षमता असणारी अद्ययावत संपूर्ण आॅटोमॅटिक आरटीपीसीआर लॅब नेरूळ येथील महानगरपालिका रुग्णालयात कार्यान्वित केली असून, २४ तासांच्या आत रिपोर्ट मिळत आहेत. या लॅबमधून आतापर्यंत ३,२५७ तपासण्या पूर्ण झाल्या आहेत.
>सोसायट्यांमध्येही चाचणी
महानगरपालिकेने १० आॅगस्टपासून ‘मिशन झीरो नवी मुंबई’ उपक्रमांतर्गत सोसायट्या, वसाहतींमध्ये जाऊन अँटिजेन टेस्टिंगला सुरुवात केली असून, १६ आॅगस्टपर्यंत ६९ सोसायट्यांमध्ये ६,९९९ व्यक्तींच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यामधील ३२५ टेस्ट्स पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
>वैद्यकीय अधिकाऱ्यांशी रोज संवाद
महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी व विभाग अधिकारी यांच्याशी दररोज सायंकाळी वेब संवाद साधला जात आहे. मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञांशीही संवाद साधला जात आहे.