भूखंड घोटाळ्यांचा तपास गुन्हे शाखेकडे
By Admin | Published: February 5, 2017 02:58 AM2017-02-05T02:58:09+5:302017-02-05T02:58:09+5:30
अनधिकृत इमारतीमधील घरे विकून सर्वसामान्यांच्या फसवणुकीत वाढ होत आहे. मोकळे भूखंड हडप करून त्यावर अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. अशा प्रकारांमध्ये
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
अनधिकृत इमारतीमधील घरे विकून सर्वसामान्यांच्या फसवणुकीत वाढ होत आहे. मोकळे भूखंड हडप करून त्यावर अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. अशा प्रकारांमध्ये शेकडो नागरिकांची लुबाडणूक होऊन संबंधित प्रशासनाचीदेखील फसवणूक होत आहे. त्यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी शहरातील भूखंड घोटाळ्यांच्या गंभीर गुन्ह्यांच्या नव्याने तपासाला सुरुवात केली आहे.
झपाट्याने होणाऱ्या विकासाबरोबरच शहरात फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्येदेखील वाढ होत चालली आहे. हत्या, दरोडे, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी अशा गुन्ह्यांबरोबरच फसवणुकीचे गुन्हेदेखील घडत आहेत. त्यापैकी फसवणुकीचे बहुतांश गुन्हे नियोजनबद्धरीत्या होत असल्याने त्याद्वारे शेकडो नागरिकांची आर्थिक लुबाडणूक होत आहे. सिडकोचे विविध प्रकल्प, विमानतळ यामुळे मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतल्या घरांच्या किमतीने उच्चांक गाठला आहे. असे असतानाही अनेकांची नवी मुंबईत घरांची मागणी वाढत आहे. याचाच गैरफायदा काही भूमाफियांकडून घेतला जात आहे. सिडकोचे अथवा अनोळखी व्यक्तीचे मोकळे भूखंड हडप करून त्यावर अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. अशा बांधकामांकडे संबंधित प्रशासनाचे, अधिकाऱ्यांचेदेखील अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची शक्यता आहे. कालांतराने अशा अनधिकृत इमारतींमधील घरांची विक्री होऊन सर्वसामान्य ग्राहकांची फसवणूक होत आहे. शहरातील प्रत्येक गावठाणालगतच्या भागात असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी माया जमवली जात आहे. अशा प्रकरणांमध्ये शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचादेखील सहभाग असल्याची काही प्रकरणे यापूर्वी उघडकीस आलेली आहेत. त्यामध्ये कोपरखैरणे, दारावे, सीबीडी येथील काही प्रकरणांचा समावेश आहे. कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील रेल्वे रुळालगतचा भूखंड हडपण्याकरिता संबंधिताकडून बनावट कागदपत्रांचा वापर झालेला आहे. सदर भूखंड स्वत:च्या मालकीचा असल्याची बनावट कागदपत्रे सादर करून संबंधिताने सिडकोसह पालिकेचीही फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये राजकीय व्यक्तीचाही सहभाग असल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर डोळेझाक होत आहे. या गुन्ह्याच्यादेखील सखोल तपासाकरिता गुन्हे शाखेकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. काही प्रकरणांची तक्रार सिडको व महापालिकेनेदेखील पोलिसांकडे केली आहे.
भूखंड हडपण्याचे प्रकार शहरात घडत आहेत. अशा गुन्ह्यांमधून अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे भूखंड घोटाळ्यांच्या प्रकरणाला आवर घालून दोषींना शिक्षेपर्यंत पोचवण्याच्या उद्देशाने गुन्हे शाखेतर्फे प्रयत्न सुरू आहेत.
- दिलीप सावंत,
उपआयुक्त, गुन्हे शाखा