शेअर्समधील गुंतवणूक पडली महागात, १ कोटी २० लाखांची फसवणूक
By कमलाकर कांबळे | Published: June 23, 2024 08:22 PM2024-06-23T20:22:05+5:302024-06-23T20:22:16+5:30
तक्रारीच्या आधारे अज्ञात तिघांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ४०६, ४१९ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोठा नफा कमविण्याच्या अमिषाला बळी पडलेल्या नेरूळमधील एका युवकाची १ कोटी २० लाख १५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी संबंधित युवकाने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरूळ येथे वास्तव्यास असलेल्या सुमित भारती (वय ३५) या तरुणाने इन्स्टाग्रामवरील एका जाहिरातीला भुलून संबंधितांनी दिलेल्या लिंकवर प्राप्त माहितीच्या आधारे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात चांगला परतावा मिळू लागल्याने त्याने १७ एप्रिल ते २१ जून या तीन महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने १ कोटी २० लाख १५ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
विशेष म्हणजे या गुंतवणुकीवर त्याच्या बँक खात्यात ३ कोटी २५ लाख ३२ हजार ९१७ रूपयांचा नफा दाखविण्यात आला. नफ्याची ही सर्व रक्कम त्याच्या संबंधित बँक खात्यात जमा झाल्याने सुमित याचा उत्साह दुणावला. त्यानंतर त्याने गुंतवणूक केलेली आणि त्यावर मिळालेल्या परताव्याची रक्कम खात्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ही रक्कम त्याला काढता आली नाही. त्यामुळे त्याने संबंधितांकडे विचारणा केली असता ब्रोकरेज आणि सर्व्हिस शुल्कापोटी ३० टक्के म्हणजेच ९० लाख रुपये भरण्यास त्याला सांगितले गेले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे सुमित याच्या लक्षात आले. त्यानुसार त्याने नवी मुंबई सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे अज्ञात तिघांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ४०६, ४१९ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.