नवी मुंबई - सिडकोच्या प्रस्तावित ‘नैना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या नगर रचना परियोजनेस (टीपीएस-२) मंजुरी दिल्यामुळे या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे. दुस-या योजनेमध्ये तब्बल ६५८२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. दोन योजना सुरू झाल्या असून, तिसरी नगररचना विभागाकडे सादर केली असून तिन्ही योजनांमध्ये तब्बल ६४८ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध होणार आहे.मुंबईमधील लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी शासनाने नवी मुंबईची उभारणी केली; परंतु या परिसरामधील जमीनही संपुष्टात येऊ लागली आहे. यामुळे शासनाने नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रामध्ये नवीन शहरे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेन व ठाणे तालुक्यामधील २७० गावांच्या परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटीज उभारण्यात येणार आहेत. शासनाने ‘नैना’ची घोषणा केली; परंतु या परिसरासाठी नगर रचना परियोजना तयार झाल्या नसल्यामुळे विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही. जुलै २०१४ पासून या परिसरामधील बांधकामांना परवानगी देण्यास सुरुवात झाली; परंतु परवानगी देण्यास खूप विलंब होऊ लागला होता. आतापर्यंत १२५ प्रकल्पांनाच बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. यापैकी १६ प्रकल्पांना बांधकाम पूर्ण झाल्याची परवानगी दिली आहे. विकास आराखड्याचे काम सिडकोने सुरू केले होते. २७ एप्रिल २०१७ रोजी अंतरिम विकास आराखड्यास शासनाने परवानगी दिली. ३७ चौरस किलो मीटर क्षेत्रामधील २३ गावांसाठी ही योजना होती.स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगररचना परियोजनांद्वारे शहरांचा विकास साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रणी आहे. मुंबई हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. म्हणून या प्रकल्पास गती देण्यासाठी सिडकोने नगररचना परियोजनांद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला व प्रारूप नगर विकास परियोजनांमध्ये बदल करत सिडकोच्या वतीने तीन दशकांनंतर ६४८ हेक्टर क्षेत्रासाठी तीन नगररचना परियोजना तयार करण्यात आल्या. पहिली टीपीएस योजना आॅगस्ट २०१७ मध्ये कार्यान्वित केली. दुसरी योजनाही कार्यान्वित केली आहे. यामध्ये देवद, भोकरपाडा, चिपळे, विहिघर, बेलवली, सांगडे गावामधील १९४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. भूखंड एकत्रीकरणावर या योजनेचे यश व अपयश अवलंबून असणार आहे. या योजनेमधील लाभधारकांना मूळ भूखंडाच्या ४० टक्के भूखंड हा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार आहे. त्यासाठी अडीच चटईक्षेत्र असणार आहे. उर्वरित ६० टक्के जमिनी पायाभूत सुविधांकरिता वापरण्यात येणार आहे. या परिसरामध्ये सार्वजनिक सुविधांसाठी ५८२ कोटींची गुंतवणूक होणार असून खासगी क्षेत्रामधून तब्बल सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूूक केली जाणार आहे.टीपीएस-२ मधील गावेउरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण व ठाणे तालुक्यांमधील २७० गावांचा ‘नैना’मध्ये अंतर्भाव आहे. यामधील २३ गावांचा पहिल्या योजनेमध्ये सहभाग करण्यात आला आहे. सिडकोने टीपीएस दोन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेमध्ये पनवेलमधील देवद, भोकरपाडा, चिपळे, विहिघर, बेलवली, सांगडे या गावांचा समावेश असणार असून, यामधील १९४ हेक्टर क्षेत्रफळाचा समावेश असणार आहे.
‘नैना’मध्ये ६५८२ कोटींची गुंतवणूक, टीपीएस-२ मुळे विकासाला चालना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 2:19 AM