- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पाप-पुण्याच्या अथवा व्यवसायवृद्धीच्या भावनेतून ठिकठिकाणी कबुतरांना रस्त्यावर धान्य टाकले जात आहे, यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यालगत शेकडो कबुतरांचे थवे पाहायला मिळत आहेत; परंतु कसलाही आवाज झाल्यास अचानक उडणारे कबुतर रस्त्यावरील दुचाकीस्वारांना धडकत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. शिवाय, नागरी वस्तीत कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे दम्यासारख्या गंभीर आजारालाही निमंत्रण मिळत आहे.शहरातील कबुतरांच्या संख्येत होत चाललेली लक्षणीय वाढ गंभीर परिणामांना कारणीभूत ठरू लागली आहे. यापूर्वी एपीएमसी बाजारपेठ आवारापुरतेच कबुतरांचे मोठ्या संख्येने वास्तव्य दिसून येत होते. मात्र, मागील काही वर्षांत कबुतरांचे हे थवे प्रत्येक विभागात जागोजागी पाहायला मिळू लागले आहेत. काहींच्या मते हे कबुतर नसून पारवे असल्याचाही दावा आहे; परंतु नागरी क्षेत्रातली त्यांची वाढती संख्या धोकादायक ठरू लागली आहे. कबुतरांना खायला धान्य टाकल्यास पुण्य लाभते, अथवा व्यवसायात वृद्धी होते, असा व्यावसायिकांमध्ये समज आहे. त्यात सोनारांसह किराणा व्यावसायिकांचा अधिक समावेश आहे. या अंधश्रद्धेतून त्यांच्याकडून दररोज सकाळ, संध्याकाळ दुकानासमोरच पदपथावर अथवा रस्त्यावर धान्य टाकले जात आहे. हे धान्य खाण्यासाठी शेकडोच्या संख्येने कबुतर त्या ठिकाणी जमा होत आहेत. तर रोजच खाद्य उपलब्ध होत असल्याने त्यांनी परिसरातील इमारती अथवा घरांच्या छतामधील मोकळ्या जागेत आपली घरटी तयार केली आहेत. यामुळे अशा अनेक इमारतींना अवकळा आली असून, त्यात शहरातील रेल्वेस्थानकांचाही समावेश आहे.रस्त्यालगत आसरा मिळणाऱ्या या कबुतरांच्या थव्यांपासून सर्वाधिक धोका दुचाकीस्वारांना उद्भवत आहे. कसलाही आवाज झाल्यास ही कबुतरे पटकन उडून एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणाकडे धाव घेतात. अशा वेळी ते रस्त्यावरून जाणाºया दुचाकीस्वारांना धडकत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. सद्यस्थितीला खारघर, वाशी, घणसोली, कोपरखैरणे यासह अनेक ठिकाणी असे प्रकार अधिक पाहायला मिळत आहेत. मुख्य रस्त्यालगतच्या बहुतांश दुकानदारांकडून कबुतरांना धान्य टाकले जाते. यावरून खारघर येथील हिरानंदानी चौकात दुचाकीस्वारांवरील संकट टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही व्यावसायिकांना कबुतरांसाठी रस्त्यावर धान्य न टाकण्याच्या सूचनाही केल्यात; परंतु नवी मुंबई व पनवेल महापालिकेकडून रस्त्यावर कबुतरांना धान्य टाकणाºयांविरोधात कसलेही ठोस पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे शहरात कबुतरांप्रति वाढत्या अंधश्रद्धेतून दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.कबुतरांपासून नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्या ठिकाणी कबुतरांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असेल, त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी व कबुतरांच्या पिसांमधून फैलणारे कीटक यापासून नागरिकांना दम्याचा आजार होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे व्यावसायिकांकडून पाप-पुण्याच्या नादात नागरी आरोग्याशीही खेळ होत असल्याचा आरोप होत आहे.नागरी लोकवस्तीमध्ये कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. कबुतरांना धान्य टाकणाºयांना याबाबत सांगूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, ही कबुतरे रस्त्यावरील दुचाकीस्वारांना धडकून अपघातांनाही कारणीभूत ठरत आहेत, अशांवर पालिकेने कारवाई करण्याची गरज आहे.- विजय खोपडे, घणसोलीकारवाईकडे दुर्लक्षरस्त्यांवर अथवा पदपथांवर कबुतरांसाठी धान्य टाकले जात असल्याने त्या ठिकाणी पादचाºयांची गैरसोय होत आहे. शिवाय, कबुतरांच्या विष्ठेमुळे त्या ठिकाणी घाणीचे व दुर्गंधीचेही साम्राज्य पसरत आहे, त्यामुळे कबुतरांना रस्त्यावर धान्य टाकणाºयांवर कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे अधिकाºयांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
कबुतरप्रेमामुळे अपघाताला आमंत्रण, दुचाकींस्वारांची सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:58 AM