नवी मुंबई : महापे शीळ मार्गावर जागोजागी खड्डे पडल्याचे अपघातांचा धोकाबळावलाआहे.शिवायवाहतूक कोंडीची देखिल समस्या भेडसावत आहे. परिणामी वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे. महापे-शीळ मार्गावर असाच प्रकार मागील काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यावरुन सातत्याने जड अवजड वाहने जात असल्याने या खड्डयांचे आकार वाढले आहेत. परिणामी काही ठिकाणी रस्त्यांचा निम्याहून अधिक भाग खड्डयात गेला आहे. तर काही ठिकाणी रस्त्याचे काँक्रेटीकरण अपूर्ण सोडण्यात आले आहे. अशा ठिकाणी अपघात घडत असल्याने वाहतूक पोलीसांना रात्रीच्या वेळी विशेष लक्ष ठेवावे लागत आहे.मिलेनियम बिजनेस पार्क चौक, महापे चौक तसेच महापे पुलालगत हे खड्डे मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत. त्याठिकाणी जलवाहिनीला मोठी गळती लागलेली असल्याने त्यामधून वाहणारे पाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे देखील रस्त्याची झीज होवून खड्डयात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही ठिकाणी रस्त्यालगत गटारेच बनवण्यात आलेली नसल्याने सांडपाण्यासह पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाहीये. याचा देखील परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होताना दिसून येत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्यांवरील हे खड्डे बुजवण्यासाठी यापूर्वी वाहतूक पोलीसांनी पुढाकार घेतला होता. त्याकरिता सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खड्डयांमध्ये बारीक खडी व वाळूचा भराव टाकून वाहनचालकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु रस्त्यावरील खड्डे कायमस्वरुपी बुजवण्यासाठी पक्क्या स्वरुपाचे डांबरीकरण अथवा काँक्रिटीकरण गरजेचे असल्याने ठरावीक कालावधीनंतर पुन्हा त्याठिकाणी खड्डे पडत आहेत. त्यामुळे नाकाबंदी अथवा इतर कारवार्इंच्या वेळी वाहतूक पोलीसांना वाहनकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.>महापे शीळ मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. त्या ठिकाणी वाहनांची गती मंदावून वाहतूककोंडीचीही समस्या निर्माण होत आहे. या संदर्भात सर्व प्रशासनांना कळवूनदेखील त्यांच्याकडून खड्डे बुजविण्यात विलंब होत आहे. परिणामी, वाहतूक पोलिसांना वाहनचालकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.- दत्तात्रय किंद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक- महापे वाहतूक शाखा
खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण, महापे - शीळ मार्गावरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:31 AM