- वैभव गायकरपनवेल : पावसाने चांगलाच जोर पकडला असून पनवेल तालुक्यात रविवारी १५८८. ७० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागाला अधिक बसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलेल्या पुलांची कामे रखडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.अतिवृष्टीमुळे पनवेल तालुक्यातील गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यात उमरोली गावातील पुलावरून पाणी गेल्याने गावाचा संपर्क तुटला. जुन्या पुलावरून पाणी गेल्याने यात एक दुचाकी वाहून गेली, यामध्ये दाम्पत्याला जीव गमवावा लागला असून अद्याप पत्नीचा शोध लागलेला नाही.सध्या उमरोलीत नव्या पुलाचे काम सुरू आहे. जुना पूल पाण्याखाली गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी सूचना फलक व इतर उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र, तसे न झाल्याने दुर्घटना घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच दोघांना जीव गमवावा लागला आहे.सध्याच्या घडीला तालुक्यात मोरबे, महाळुंगी या ठिकाणी मोरीवर पुलाचे काम सुरू आहे, तर केवाळे पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी अद्याप अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणाहून सुरू करण्यात आली नाही. पनवेल तालुक्यातील अतिवृष्टीचा फटका वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सिद्धी करवले येथील पूलही यंदा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागले. हा विभाग पनवेल महापालिकेच्या अखत्यारित येतो. देवद गावात जाण्यासाठी गाढी नदीतून पर्यायी मार्ग आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणाहून चारचाकी स्कॉर्पिओ गाडी वाहून जाण्याचा प्रकार घडला. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने गाडी पाण्यातून बाहेर काढण्यास यश आले.तालुक्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थ धोकादायक शॉर्टकट वापरून प्रवास करतात. मात्र, प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत नसल्याने दुर्घटना घडत असल्याचे समोर येत आहे. यंदा खारघरमध्येही नाला फुटल्याने पांडवकड्याचे पाणी घुसल्याने कोपरा परिसर जलमय झाला होता, यामुळे सायन-पनवेल महामार्गावरही पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सिडकोच्या नियोजनाअभावी नागरिकांना फटका बसला. नाल्यावर सिडकोने उभारलेला तात्पुरत्या स्वरूपाचा पूलच पांडवकड्याच्या पाण्याला अडथळा ठरत आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी पाण्याचा प्रवाह बदलण्याचे काम सुरू आहे. मात्र, काही कारणास्तव सिडकोला हे काम पूर्ण करता आलेले नाही.पनवेल तालुक्यातील बारापाडा, डोलघर या दोन गावांना नेहमीच अतिवृष्टीचा फटका बसत असतो. सुमारे दोन-दोन दिवस या गावांचा संपर्क तुटतो. याकरिताही तहसील प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची गरज आहे.>प्रशासनामार्फत कोणत्याही सूचना नाहीतपनवेल तालुक्यात सुरू असलेल्या पुलांच्या कामांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा सिडको प्रशासन सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. देवद, उमरोली आदीसह ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहेत, त्या ठिकाणी नागरिकांसाठी सूचना देणारे फलक लावणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात दुर्घटना टाळता येतील, असे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पनवेल तालुक्यात पुलांच्या अपूर्ण कामांमुळे अपघातांना निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 11:35 PM