चौथ्या प्रयत्नात IPS तर पाचव्या प्रयत्नात IAS; नवी मुंबईकराने मिळवली १२६ वी रँक
By सूर्यकांत वाघमारे | Published: April 22, 2024 07:16 PM2024-04-22T19:16:36+5:302024-04-22T19:16:54+5:30
विवेक सोनावणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत स्वबळावर घवघवीत यश मिळवले आहे.
नवी मुंबई: बेलापूर येथे राहणाऱ्या विवेक सोनावणे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत स्वबळावर घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या प्रयत्नात आयपीएस मिळूनदेखील त्याहून अधिक रँक मिळवण्याच्या प्रयत्नात त्यांनी पाचव्यांदा परीक्षा दिली. त्यामध्ये देशात १२६ तर राज्यात पाचवे स्थान मिळवले आहे. अभिनंदनाचा बॅनर लावण्यासाठी पोलिसांची परवानगी मागण्यास गेल्यावर त्यांचे हे धवल यश लक्षात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये नवी मुंबईकरांनी देशभर नावलौकिक मिळवला आहे. बेलापूर येथे राहणाऱ्या विवेक सोनावणे यांनीही स्वबळावर धवल यश मिळवले आहे. चौथ्यांदा केलेल्या प्रयत्नात त्यांनी ७९२ रँक मिळवून आयपीएसपद मिळवले होते.
मात्र, आपली क्षमता त्याहून अधिक असल्याचा त्यांना विश्वास होता. यामुळे पाचव्यांदा त्यांनी परीक्षा दिली अन आयएएस करिता पात्र ठरले. मुलाखतीमध्येच त्यांनी १९३ गुण मिळवले होते. वडील महावितरणमध्ये सहायक अभियंता पदावर आहेत, तर आई गृहिणी. घरची परिस्थती सामान्य असल्याने कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या क्लासची पायरी न चढता स्वतःच तयारी करण्याची मनाची गाठ त्यांनी बांधली होती. यातून अभ्यासाचे नियोजन करून परीक्षेचा असलेला पूर्वानुभव त्यांनी पुरेपूर वापरला. त्यात आईवडिल व बहिणीची मिळालेली साथ ते महत्त्वाची मानतात. वर्षभर कुठेही नोकरी न करता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्याने आपण हे यश मिळवू शकलो याचा आनंद ते व्यक्त करतात.
पोलिसही झाले अवाक्
विवेक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राहत्या परिसरात त्यांचा बॅनर लावण्याच्या परवानगीसाठी त्यांचे मित्र मंडळी सीबीडी पोलिस ठाण्यात गेले होते. त्यांच्यातल्या चर्चेदरम्यान विवेक यांचे यश वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या कानी पडले. स्वतः अभ्यास करून त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याने पोलिसांच्या वतीने त्यांचा पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.