खांदेश्वर स्थानकासमोरील लोखंडी पत्रे काढले; शिवसैनिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:22 AM2019-12-13T00:22:00+5:302019-12-13T00:22:20+5:30
कामोठेकडे जाणारा मार्ग केला मोकळा
कळंबोली : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खांदेश्वर रेल्वे स्टेशन समोर इमारती बांधण्यात येणार आहेत. याकरिता पत्रे लावून कामोठेकडे जाणारा रस्ता अडवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे आणि शिवसैनिकांनी या ठिकाणचे पत्र काढून प्रवाशांना रस्ता मोकळा करून दिला. शिवसेना आक्रमक होत असल्याचे पाहून संबंधित एजन्सी नरमल्याचे दिसून आले.
बस आणि ट्रक पार्किंगच्या वर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडको इमारती बांधणार आहे. त्यामध्ये खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील बस टर्मिनस आणि पार्किंगच्या जागेचाही समावेश आहे. या जागेवर १५ दिवसांपूर्वी इमारतींचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने पत्रे टाकले. तसेच या भागात साइड आॅफिसकरिता कंटेनर आणले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्या इमारती या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत. त्याला कामोठेकरांनी विरोध दर्शवला आहे.
सामाजिक संस्थांनी विरोधात आवाज उठवला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सूरदास गोवारी यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देऊन पंतप्रधान आवास योजना अंतर्गत उभारण्यात येणारा हा प्रकल्प दुसरीकडे हलवावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेनेसुद्धा यामध्ये आघाडी घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता रामदास शेवाळे यांच्यासह कामोठे शहरप्रमुख राकेश गोवारी, कळंबोली शहरप्रमुख नीलेश भगत, आत्माराम गावंड, कृष्णकांत कदम, बबन काळे, विलास कामोठकर, संदीप प्राध्ये, संतोष पडळकर, गुलाब भोर, धाया गोवारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या बाहेर जाऊन कामोठे शहर तसेच नौपाडाकडे जाणारा रस्ता पत्रे लावून अडवण्यात आला होता.
तेथील पत्रे काढून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तो जनतेसाठी खुला करून दिला. सर्वसामान्यांच्या मागणीचा विचार करीत एजन्सीने कटरच्या साह्याने पत्रे आणि लोखंडी खांब काढून घेतले. यामुळे रेल्वे स्टेशनला जाणाºया-येणाºया रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
सिडकोने सतत आणि कायम मनमानी केली. त्यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरच पंतप्रधान आवास योजनेचे घरे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. याविषयी त्यांनी रहिवाशांना विश्वासात घेतले नाही, तसेच त्यांचा रस्ताही बंद करून टाकला. सिडको जनसामान्यांची अशाप्रकारे अवहेलना करत असेल, तर शिवसेना ते खपवून घेतले जाणार नाही. याच भावनेतून आम्ही खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर अडवलेला रस्ता मोकळा करून दिला आहे.
- रामदास शेवाळे, पनवेल महानगरप्रमुख, शिवसेना