नवी मुंबई : मोरबे ते दिघा दरम्यानच्या जलवाहिनीच्या सुरक्षेविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले होते. पामबीच रोडवरील नेरुळमधील लोखंडी पुलाचा सांगाडा तत्काळ बदलण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले आहे.ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमधील होल्डिंग पॉण्डमधील पाणी खाडीत जाण्यासाठी असलेल्या नाल्यावर महापालिकेने लोखंडी पूल बांधून त्यावर जलवाहिनी ठेवली होती. पुलाचा लोखंडी सांगाडा पूर्णपणे गंजला होता. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने दुसऱ्या दिवशीच दुरुस्तीचे काम सुरू केले होते. एक आठवड्याच्या आतमध्ये गंजलेल्या सर्व पट्ट्या काढण्यात आल्या आहेत. पुलाला पुन्हा गंज लागू नये, यासाठी रंगही लावण्यात आला आहे. यामुळे जलवाहिनी पूर्णपणे सुरक्षित झाली आहे.महापालिका प्रशासनाने शहरातील घणसोली व इतर सर्व ठिकाणच्या जुन्या पुलांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. ज्या पुलाच्या सुरक्षेविषयी नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केली आहे. प्रसारमाध्यमांनी येथील सुरक्षेविषयी शंका उपस्थित केली त्या सर्व ठिकाणी पाहणी करून उपाययोजना केल्या जात आहेत.
लोखंडी पुलाची दुरुस्ती पूर्ण; जलवाहिनी बनली सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:17 AM