शहरवासीयांना अनियमित पाणीपुरवठा, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 03:06 AM2018-08-01T03:06:14+5:302018-08-01T03:06:28+5:30
शहराच्या विविध भागात सकाळपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुरेशी माहिती दिली न गेल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
नवी मुंबई : शहराच्या विविध भागात सकाळपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुरेशी माहिती दिली न गेल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही, तर काही भागात एकच वेळा आणि तोही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांचे हाल झाले.
मोरबे धरणाच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. दुरुस्तीच्या कालावधीत सोमवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे सूचित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा न झाल्याने रहिवाशांत तारांबळ उडाली. कोपरखैरणे, घणसोलीसह वाशी व नेरूळ परिसरातही दिवसभर अनियमित पाणीपुरवठा सुरू होता. संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवाशांनी पाण्यासाठी जवळच्या जलकुंभावर गर्दी केली होती. शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अशात पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने नागरिकांत नाराजीचा सूर दिसून आला. दरम्यान, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने त्यात पुन्हा बिघाड झाला. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. असे असले तरी सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोपरखैरणे) संजय देसाई यांनी व्यक्त केला.