नवी मुंबई : तुर्भे भागात एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, नागरिक हैराण झाले आहेत. बुधवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत पाणी विषयावरून चर्चा सुरू असताना महापालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले.सीबीडी सेक्टर १ येथील पाणीपुरवठा पंपहाउस येथे २२ किलव्हॅट वीजवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने सद्यस्थितीतील वीजवाहिनी बदलून ११ किलव्हॅट करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत चर्चेसाठी आला होता, त्यावर चर्चा करताना नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी वाशी सेक्टर ३ व सेक्टर ४ मधील महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांना गळती लागल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून देत, यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून प्रश्नाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी विद्युत विभागाने गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा दुरु स्तीची कामे काढली आहेत, तरीदेखील चढवावरील भागात पाणी येत नसल्याचे सांगत इलेक्ट्रिक पंप, पॅनल ना दुरु स्त असल्याचे सांगत, वॉटर रिस्टोर व्हायला वेळ का लागतो? असा प्रशासनाला सवाल केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी झोपडपट्टी भागातदेखील पाण्याच्या खूप समस्या असून नागरिक घेराव घालत असल्याचे सांगितले.२० वर्षे जुन्या लाइन असून चढावावरील भागात पाणी चढत नसल्याचे सांगत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होताना शटडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. तुर्भे भागातील नागरिकांना मोरबेचे पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक शिवराम पाटील यांनी काही ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होईपर्यंत पाणीपुरवठा केला जातो, तर गरीब नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप केला. तसेच २४ तास पाणी नको दिवसातून दोन तास पाणी द्या, अशी मागणी केली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सदस्यांच्या भावना आयुक्तांना सांगणार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.तुर्भेमधील नागरिक करणार आंदोलनएमआयडीसीतर्फे तुर्भे भागाला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शटडाउन आणि इतर कारणांमुळे पाणीपुरवठा होण्यास अनेक अडथळे येत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या विषयाचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घेऊन काही दिवसांत पाण्याची समस्या दूर करावी अन्यथा तुर्भेमधील प्रभाग क्र मांक ६८, ६९, ७० आणि प्रभाग क्र मांक ७३ मधील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
सहा महिन्यांपासून तुर्भे परिसरात अनियमित पाणी, स्थायी समितीत उमटले पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 3:39 AM