नवी मुंबई - एक वर्षापेक्षा अधिक काळ विस्थापित अवस्थेत वास्तव्य करणाऱ्या इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांचा दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश झाला. पंधरा दिवसांत स्थिरस्थावर झाल्यानंतर येथील आदिवासी बांधवांनी दिवाळीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. विशेषत: लहान मुलांनी आपल्या हक्काच्या घरासमाेरील प्रशस्त अंगणात फटाके वाजवून दिवाळीचा आनंद लुटला.
२७ जुलै २०२३ रोजी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने इर्शाळवाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. या आपदग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने येथील नानिवली गावात २.६ हेक्टर जागेवर पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. सिडकोने अगदी निर्धारित कालावधीपेक्षा कमी काळात सर्व सुविधांनी युक्त असा हा पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ पक्की घरे बांधली आहेत.
विशेष म्हणजे आपदग्रस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ४४ भूखंडांवर ४४ घरे बांधण्यात आली आहेत. पुनर्वसन प्रकल्पाची ही जागा काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर आहे. असे असले, तरी भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित जागेच्या सर्व बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच पाणी, वीज आणि रस्ते आदी सोईसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.