इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 06:05 AM2024-10-07T06:05:31+5:302024-10-07T06:06:26+5:30

दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

irshalwadi rehabilitation dussehra muhurat for house | इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोने निर्धारित वेळेत पूर्ण केला आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी इर्शाळवाडीतील आपद्वस्तांना घरांचे वाटप करण्याचे सुतोवाच त्यांनी या पाहणीदरम्यान केले होते. त्यानुसार संबंधित विभाग कामाला लागला असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर आपढ्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे २७ जुलै २०२३ रोजी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. या दुर्घटनेत वाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरडग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार चौक येथे २.६ हेक्टर जागेवर सिडकोने पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. 

विशेष म्हणजे आपद्वस्तांना त्यांच्या हक्काच्या घरांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी घरांचे वाटप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या शुक्रवारी या पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर आचारसंहितेपूर्वी या घरांच्या चाव्या संबंधित लाभधारकांना देण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे. त्यानुसार संबंधित विभाग कामाला लागला आहे.

२.६ हेक्टर जागेवर आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन 

चौकजवळील नानिवली गावातील २.६ हेक्टर जागेवर इर्शाळवाडी आपद्गस्तांचे पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ पक्की घरे बांधली जात आहेत. विशेष म्हणजे आपद्वस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ४४ भूखंडांवर ४४ घरे बांधली आहेत. प्रकल्पाची ही जागा काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर आहे. असे पुनर्वसन असले तरी भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित जागेच्या सर्व बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधण्याचे कामही पूर्णत्वास आले आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाणी, वीज आणि रस्ते आदी सोयी-सुविधांचे कामेसुद्धा पूर्ण झाली आहेत.
 

Web Title: irshalwadi rehabilitation dussehra muhurat for house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.