‘त्यांना’ एप्रिलअखेर मिळणार हक्काचे घर; ‘इर्शाळवाडी’ पुनर्वसन अंतिम टप्प्यात
By कमलाकर कांबळे | Published: March 13, 2024 08:16 AM2024-03-13T08:16:28+5:302024-03-13T08:17:56+5:30
एप्रिल महिन्याच्या अखेरीस या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोने पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे निर्धारित कालावधीपेक्षा दोन महिने अगोदरच हे काम पूर्ण करून सिडकोच्या संबंधित विभागाने आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखविली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस या पुनर्वसन प्रकल्पाचे लोकार्पण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी २७ जुलै रोजी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊन वाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरडग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करण्याचे निर्देेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या २.६ हेक्टर जागेवर राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार आपदग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले होते. विशेष म्हणजे त्यासाठी सिडकोला अवघ्या सहा महिन्यांचा अल्टिमेटम् दिला होता. मात्र, चार महिन्यातच हा प्रकल्प पूर्ण केल्याने सिडकोचे कौतुक होत आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस या घरांचा ताबा आपदग्रस्तांना देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
३० कोटींचा पुनर्वसन प्रकल्प
- नानिवली गावातील २.६ हेक्टर जागेवर इर्शाळवाडी आपदग्रस्तांचे पुनर्वसन केले जात आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ पक्की घरे बांधली जात आहेत.
- विशेष म्हणजे आपदग्रस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर सिडकोने ही घरे बांधली जात आहेत. सध्या ४४ पैकी ३१ घरे बांधून तयार आहेत.
- नियोजित जागेच्या सर्व बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाणी, रस्ते आदी काम वेगाने सुरू आहे.
दोन महिनेआधीच काम केले पूर्ण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळ्यापूर्वी आपदग्रस्तांना घरे देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना सिडकोला दिल्या होत्या. मात्र, निर्धारित मुदतीच्या दोन महिने अगोदरच हा प्रकल्प पूर्ण केल्याने सिडकोच्या अभियांत्रिकी विभागाचे कौतुक होत आहे.