चीनकडून होताेय पाकिस्तानला आण्विक साहित्याचा पुरवठा?

By नारायण जाधव | Published: March 2, 2024 08:37 PM2024-03-02T20:37:15+5:302024-03-02T20:37:44+5:30

भारतीय समुद्रात सुरक्षायंत्रणांनी पकडले इटालियन बनावटीचे संगणकिय मशिन

is china supplying nuclear materials to pakistan | चीनकडून होताेय पाकिस्तानला आण्विक साहित्याचा पुरवठा?

चीनकडून होताेय पाकिस्तानला आण्विक साहित्याचा पुरवठा?

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई/उरण : चीनमधून कराचीकडे जाणाऱ्या एका जहाजातून पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी वापरता येवू शकतील, अशा संशयास्पद साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रात भारतीय सुरक्षायंत्रणांनी पकडला आहे. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने सुरक्षायंत्रणात खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण (CNC) मशिन सापडले आहे.

२२१८० किलो ग्रॅम वजनाचा हा माल चीनमधील तैयुआन मायनिंग इम्पोर्ट ॲण्ड एक्सपोर्ट कंपनीने पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनिअरच्या नावाने पाठविण्यात आले होते.असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २३ जानेवारी २०२४ रोजी ही कारवाई केली असली तरी युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधक अणुसाहित्य पाकिस्तान छुप्या मार्गाने चीनमधून दुहेरी-वापर वस्तुंच्या नावाखाली मागवित असल्याचा मोठा खुलासा यामुळे सुरक्षायंत्रणांना झाला असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या कारवाईत सीमा शुल्क विभाग, डीआरडीओ आणि सुरक्षायंत्रणांशी संबधित इतर अधिकारीही सहभागी झाले होते, असे सांगण्यात येत आहे. जेएनपीए बंदरात हे साहित्य पकडल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिक अधिकाऱ्यांनी ते बंदरात नव्हे तर भरसमुद्रात सुरक्षायंत्रणांनी जानेवारीत ही कारवाई केल्याचे म्हटले आहे.

जे मशिन पकडले आहे, त्याचा वापर पाकिस्तान त्यांच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात करू शकतो, असा संशय सुरक्षायंत्रणांना आहे. ते इटालियन कंपनीने बनवलेले कॉम्प्युटर न्युमेरिकल कंट्रोल (सीएनसी) मशीन आहे. २२१८० किलो वजनाची यामशिनमध्ये आण्विक आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमांशी संबंधित अनेक आवश्यक भाग सापडले आहेत.

युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधित वस्तू घेण्यासाठी पाकिस्तान आता चीनचा वापर करत आहे का, असे बोलले जात असून ओळख लपवून त्या आणल्या जात होत्या. माल पाठवणाऱ्या कंपनीची नोंदणी 'शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कं, लिमिटेड' म्हणून केलेली असून ज्या कंपनीला हे मशिन पाठवले जात हाेते ती सियालकोटची 'पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेड' नावाची कंपनी आहे.

यापूर्वीही फेब्रुवारी २०२० मध्ये, चीन 'इंडस्ट्रियल ड्रायर्स'च्या नावाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत असल्याचे आढळले होते. यामुळे चीनमधून 'दुहेरी-वापर' लष्करी दर्जाच्या वस्तुंच्या नावाखाली पाकिस्तान भारतीय बंदराच्या मार्गे आण्विक कार्यक्रमांसंबधीत साहित्य मागवित असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

कॉसमॉस इंजिनियरिंग,ही पाकिस्तानी संरक्षण पुरवठादार कंपनी तेंव्हापासूनच वॉचलिस्टवर आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये चीन "औद्योगिक ड्रायर" च्या आच्छादनाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा पुरवठा करत होता. याशिवाय, नागरी अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी चीनने पाकिस्तानला मदत केली आहे. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात वापरल्या जाणाऱ्या ऑटोक्लेव्हच्या जप्तीमुळे मात्र पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या बेकायदेशीर व्यापारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे (एमटीसीआर) उल्लंघन करत असल्याची भीती बळकट झाली असल्याचेही या जेएनपीटी बंदरातील एका सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: is china supplying nuclear materials to pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.