कर्जत/नेरळ : कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील भिसेगावातील गोसावी समाजाची गेली अनेक वर्षांपासून असलेली दफनभूमीची जागा व त्याच्या जवळपास असलेली जागा अरिहंत टॉवर या विकासकाने खरेदी केली आहे. त्या ठिकाणी मोठे टॉवर उभे राहत असताना दफनभूमीचा वाद चिघळला आहे. सोमवारी भिसेगावातील एका लहान मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे दफन करण्यापूर्वी गावातील ग्रामस्थ नेहमीच्या दफनभूमीवर खड्डा करण्यासाठी गेले असता तेथील व्यवस्थापकाने विरोध केला. त्यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी आम्ही मृताचे दफन करायचे कुठे, असा प्रश्न केला. काही काळ अरिहंत साईटवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याप्रसंगी तेथील व्यवस्थापकांनी वरिष्ठांशी बोलून पर्यायी मार्ग काढू असे आश्वासन दिले. परंतु ग्रामस्थ त्या मन:स्थितीत नसल्याने जोपर्यंत दफनभूमीच्या जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत अरिहंत साईटवर कोणतेही काम करायचे नाही असा पवित्रा घेतल्याने जेसीबीच्या सहाय्याने साईटवर जाणारा रस्ता खोदून अरिहंत साईटचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले. गेल्या अनेक वर्षांपासून भिसेगावातील गोसावी समाजासाठी गावातील मागच्या बाजूस असलेल्या डोंगरावर दफनभूमी होती, तसेच गावातील इतर समाजातील लहान मुलाचे मृत्यूनंतर त्याच दफनभूमीत पुरले जायचे परंतु आता ती जागा मुंबईतील अरिहंत या विकासकाने जागा खरेदी करून काम सुरु केल्याने ग्रामस्थांना दफनभूमीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोमवारी गावातील एका लहान मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे दफन करायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाल्यावर गावातील तरु ण मंडळी एकत्र येऊन थेट अरिहंत साईटवर पोहचले व व्यवस्थापकांशी चर्चा केल्यावर, जोपर्यंत दफनभूमीचा कायमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत येथे कोणतेही काम करायचे नाही असे सांगून अरिहंत साईटचे काम बंद पाडले. यावेळी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, चंद्रकांत राऊत, गजानन दुर्गे, योगेश थोरवे, राजेंद्र देवघरे, जयंत खराडे, बाळा दिसले, सुनील लाड, शरद खराडे, विश्वनाथ लोखंडे, दिनेश ठोंबरे, रोशन ठोंबरे,अमोघ कुलकर्णी, सीताराम कडू आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
दफनभूमीचा वाद चिघळला
By admin | Published: February 02, 2016 2:05 AM