सीबीडीतील कोकण भवनमध्ये सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:29 PM2019-03-12T23:29:02+5:302019-03-12T23:29:23+5:30
तपासणी कक्ष सुरू नाही; वेगवेगळ्या विभागांची ८४ कार्यालये
नवी मुंबई : शासनाच्या विविध विभागाची कार्यालये असलेल्या सीबीडीतील कोकण भवनमध्ये कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी कक्ष तयार करण्यात आला आहे, परंतु या कक्षात तपासणी करणारी यंत्रणा उपलब्ध नसून कोणत्याही ये-जा करणाऱ्या नागरिकांची कोणत्याही प्रकारची तपासणी केली जात नाही त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाºया सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात शासनाच्या वेगवेगळ्या विभागांची एकूण ८४ महत्त्वाची कार्यालये आहेत. विविध जिल्ह्यांची महत्त्वाची शासकीय कार्यालये या ठिकाणी असून विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण आयुक्त राज्य गुप्तचर विभाग, माहिती उपसंचालक, विक्रीकर, महसूल खाते, जातपडताळणी, आयुक्तालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरविकास विभाग, निवडणूक विभाग आदी कार्यालये आहेत.
शासनाची विविध कार्यालये असल्याने विविध कामानिमित्त ये-जा करणाºया नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारावर तसेच आतील भागात सुरक्षेची स्थिती अतिशय गंभीर असून या ठिकाणी मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर आदी आधुनिक सुरक्षा उपकरणांचा व उपकरणे हाताळणाºया कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर तपासणी कक्ष बांधण्यात आला आहे. परंतु या कक्षामध्ये तपासणी करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. तसेच या इमारतीमध्ये कामानिमित्त ये- जा करणाºया नागरिकांची नोंद देखील ठेवण्यात येत नाही.