- वैभव गायकरपनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काँक्रीटमधून लोखंडी सळई वरती आल्या असून, त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. महामार्ग पोलिसांनीही याविषयी संबंधित प्रशासनाला माहिती दिली असून अद्याप दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.दोन महानगरांना जोडणारा देशातील पहिला नियंत्रित प्रवेश महामार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा समावेश आहे. शासनाने १९९८ मध्ये महामार्गाचे काम सुरू केले व ११४६ कोटी रुपये खर्च करून २००२ मध्ये काम पूर्ण केले. यामुळे मुंबईमधून पुण्यापर्यंत दोन ते अडीच तासांमध्ये पोहोचणे शक्य होऊ लागले. ९४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावर खालापूर व तळेगाव येथे टोलनाका सुरू करण्यात आला आहे. प्रतिदिन हजारो वाहने या रोडवरून जात असतात. मागील काही महिन्यांपासून महामार्गाच्या दुरुस्तीकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होऊ लागले आहे. कळंबोली ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. दोन्ही मार्गिकेच्या मधील जोड तुटला असून काँक्रीटमधून लोखंड बाहेर आले आहे. महामार्गावरून वेगाने वाहतूक सुरू असते. लोखंड चाकामध्ये जाऊन टायर फुटण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे व टायर फुटल्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. अनेक दिवसांपासून याविषयी वाहनचालकही तक्रारी करू लागले आहेत; परंतु ठेकेदार प्रशासनही याकडे दुर्लक्ष करू लागले आहे. यामुळे अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा प्रश्नही वाहनचालक विचारू लागले आहेत.महामार्गावर कळंबोलीपासून पुढे ७, ९, १३, १४ व २३ किलोमीटरवर खड्डे पडले. पडलेल्या या खड्ड्यांमुळे व काँक्रीटमधून बाहेर आलेल्या लोखंडामुळे अपघात होण्याचा धोका पोलिसांच्याही निदर्शनास आला आहे. महामार्ग पोलिसांनी याविषयी प्रशासनाला लेखी कळविले आहे; परंतु या पत्राचीही दखल अद्याप घेण्यात आलेली नाही.महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी दिलेल्या पत्राकडेही दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशीच स्थिती राहिली तर या खड्ड्यांमध्ये वाढ होऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही महामार्गावर अनेक अपघात होऊन प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. विनाविलंब खड्डे बुजविले नाहीत तर भविष्यातही गंभीर अपघात होऊ शकतात, अशी भीती पोलिसांनी व वाहतूकदारांनीही व्यक्त केली आहे.एक्स्प्रेस वेवरील गँट्री गेटचे काम पूर्णमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर शुक्रवारी गँट्री गेट बसविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याकरिता दोन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. गेट बसविण्याचे काम पूर्ण झाल्यावर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली. शेडुंग फाट्याजवळ कि.मी. ७/०५० व ३०/४०० पुणे वाहिनीवर बसविलेल्या कमानीवर महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेडने ओव्हरहेड गँट्री गेट बसविण्याचे काम दुपारी १२ ते २ दरम्यान हाती घेतले होते. कामाकरिता वाहतुकीत बदल करून पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय महामार्ग पोलिसांनी घेतला आहे.प्रवासी वाहनांसाठी पर्यायी मार्ग १ किमी ते कळंबोली सर्कल -उरण बायपास रोड - टी पॉइंट -पळस्पे फाटा - कोन गाव (एनएच ४ मार्गे ) - शेडुंग, चौकफाटा - खालापूर अशी वाहतूक वळविण्यात आली होती. तर पर्यायी मार्ग २ किमी ते कळंबोली सर्कल - खांदा वसाहत सिग्नल -पनवेल ओव्हर ब्रिज -तक्का गाव (पंचमुखी हनुमान मंदिर)-पळस्पे फाटा -कोन गाव -कोन ब्रिज -शेडुंग -चौकफाटा -खालापूर अशी व्यवस्था करण्यात आली होती. दोन तासांत काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती महामार्ग पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी दिली.ठेकेदाराचेही दुर्लक्षमहामार्गावर प्रत्येक वाहनाकडून टोल घेतला जात आहे. देशातील सर्वात प्रमुख महामार्ग म्हणून द्रुतगती महामार्गाची ओळख आहे. यामुळे या रोडवरील दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, अशी अपेक्षा वाहनचालकांनी केली आहे; परंतु जबाबदारी असलेल्या ठेकेदाराकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.टायर फुटल्याच्या तक्रारीमहामार्गावर खड्ड्यांमुळे टायरचे नुकसान झाल्याचे व टायर फुटत असल्याच्या काही तक्रारी महामार्ग पोलिसांकडेही प्राप्त झाल्या आहेत. महामार्ग पोलिसांनीही याविषयी संबंधितांकडे पत्रव्यवहार करून तत्काळ दुरुस्तीची कामे करावी, अशी मागणी केली आहे.एक आठवड्यापूर्वी द्रुतगती महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसदर्भात रस्ते विकास महामंडळाशी पत्रव्यवहार केला आहे. तत्काळ दुरुस्तीची कामे करावी, असे सुचविले आहे; परंतु अद्याप खड्डे व्यवस्थित बुजविलेले नाहीत.- सुदाम पाचोरकर,पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही खड्डे; अपघाताची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:03 PM