दाटून कंठ येतो...

By admin | Published: April 18, 2017 06:40 AM2017-04-18T06:40:44+5:302017-04-18T06:40:44+5:30

पुरस्कार, सन्मानाचे क्षण आयुष्यात क्वचित येतात. केलेल्या कामाची, घेतलेल्या कष्टाची ती पावती असते. साहजिकच, त्या वेळी सत्कारमूर्तींच्या मनात आनंदाच्या, कर्तव्यपूर्तीच्या भावना असल्या

It comes to the forearm ... | दाटून कंठ येतो...

दाटून कंठ येतो...

Next

पुरस्कार, सन्मानाचे क्षण आयुष्यात क्वचित येतात. केलेल्या कामाची, घेतलेल्या कष्टाची ती पावती असते. साहजिकच, त्या वेळी सत्कारमूर्तींच्या मनात आनंदाच्या, कर्तव्यपूर्तीच्या भावना असल्या; तरी मनोगत व्यक्त करताना कंठ दाटून येतो. असेच काही भावनावश क्षण रिजन्सी प्रस्तुत लोकमत लीगसी कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते लीगसी पुरस्कारप्राप्त मान्यवरांना गौरवण्यात आल्यानंतर काहींनी त्यांना लवून नमस्कार केला; तर काहींनी आपल्या छोटेखानी भाषणात आमटे कुटुंबाच्या सेवाभावी वृत्तीचा आवर्जून उल्लेख केला. उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील पुरस्कारार्थ्यांनी विको लॅबोरेटरीजच्या पेंढरकर यांच्या वारशाचा आवर्जून उल्लेख करीत तेच आमचेही व्यवसाय क्षेत्रातील आदर्श असल्याचे नमूद केले. तब्बल साठहून अधिक कंपन्यांचे वित्तीय सल्लागार असलेल्या, व्यवस्थापन आणि आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉ. गिरीश जाखोटिया यांच्या ‘कृष्णनीती’वरील भाष्यामुळे अनेक जण प्रभावित झाले नि त्यांनीही डॉ. जाखोटिया यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत आपण त्याचे कसे आचरण करीत आहोत, हे सांगितले.
बहुतांश पुरस्कारविजेते हे आपले आईवडील, पत्नी, मुले, बहीणभाऊ, मित्र परिवारासोबत आले होते. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून आईवडील हरखून गेले, तर आपल्या वडिलांच्या कार्याला मिळणारी पोचपावती पाहून मुलामुलींनी आपले वडील हेच आपले आदर्श असल्याची जाहीर कबुली दिली. बहीणभावांनी हातात हात गुंफून पुरस्कार, सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर सोबत सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्याने ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा हा एकाअर्थी त्यांच्याकरिता कौटुंबिक सोहळा ठरला. (प्रतिनिधी)

फुलले रे क्षण माझे...
प्रिया गुरनानी, आर्किटेक्ट
या पुरस्कारामुळे अभिमानास्पद वाटत आहे. हा
पुरस्कार म्हणजे आमच्यासारख्या तरुणांना प्रोत्साहन देणारा आहे. ‘लोकमत’ने काढलेली पुस्तिका खूपच सुंदर आहे.
विवेक पंडित, शिक्षणतज्ज्ञ
हा पुरस्कार पंडित कुटुंबासाठी असला, तरी हे कुटुंब पाच ते सहा हजार सदस्यांचे आहे. मी फक्त या कुटुंबाचा ज्येष्ठ कर्ता आहे. माझे विद्यार्थी माझा समाजसेवेचा वारसा नक्कीच पुढे नेतील, याची मला खात्री आहे.
मनोज राय, बांधकाम व्यावसायिक
या पुरस्काराबद्दल मी ‘लोकमत’चा खूप आभारी आहे. लोकांचे स्वप्न पूर्ण करणे, हे आमचे ध्येय आहे. बाबा आमटे यांना मी आदर्श मानतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन समाजात जाऊन सेवा करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.
दीपेश म्हात्रे, नगरसेवक
‘लोकमत’ परिवाराचे खूपखूप आभार. अशा पुरस्कारामुळे आमच्यासारख्या तरुणांना प्रेरणा मिळते. वडिलांचा वारसा मी नक्कीच पुढे जपणार.
निरंजन डावखरे, आमदार
‘लोकमत’ने या पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल मी आभारी आहे. कुटुंबाची लीगसी पुढे नेण्याचे काम जे करतात, त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे खूप आनंद होत आहे.
सचिन ओटवणेकर आणि विजय राजपूत, बांधकाम व्यावसायिक
‘लोकमत’ समूहाचे खूपखूप आभार. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकत या पुरस्कारासाठी आमची निवड केली.
वामन म्हात्रे,
कुळगाव-बदलापूरचे नगराध्यक्ष
बदलापूर हे शहर म्हणजे माझा परिवार आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने या शहराला विकासाच्या दृष्टीने पुढे नेणार आहे. बदलापूर शहराचा नावलौकिक नक्कीच वाढवणार आहे.
डॉ. पुष्कराज धामणकर, तन्वी हर्बल
या कार्यक्रमाच्या दिवशी माझ्या मेहुणीला मुलगी झाली. त्यामुळे हा पुरस्कार नेहमीच आमच्या लक्षात राहील. लीगसी कॉफीटेबल बुक प्रसिद्ध होत असताना आमच्या लीगसीत एका नव्या व्यक्तीचा समावेश झाला, ही निश्चित आनंदाची बाब आहे. आम्ही पेंढरकर कुटुंबाचा नेहमीच आदर्श समोर ठेवला आहे आणि त्यांच्याकडे पाहून आमचे कार्य पुढे नेणार.
समीर नातू : धन्यवाद, लोकमत परिवार! ‘लोकमत’ दरवेळी आगळावेगळा उपक्रम राबवत असते. या दिग्गजांच्या हस्ते आमचा सन्मान केला आहे. आमच्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे.
डॉ. संदीप माने
हा मान मला दिला, त्याबद्दल मी ‘लोकमत’चे खूप आभार मानतो. शिक्षण, संस्कार, शिस्त ही आमची लीगसी आहे. शिक्षणाला संस्कार आणि संस्काराला शिस्त लागली, तर आपण सुशिक्षित होतो. आमच्या आईवडिलांनी आम्हाला सुशिक्षित बनवले. इंग्लंडमध्येच काम करण्याची आॅफर होती. परंतु, ‘लोकमत’च्या ‘आम्ही महाराष्ट्रीयन’मध्ये ज्याप्रकारे आपल्या राज्याची महती सांगितली आहे, ती लक्षात घेऊन देशाच्या ओढीने मायदेशी परतलो. आम्ही स्थापन केलेल्या ओरिजिन फाउंडेशनच्या माध्यमातून ‘रेझिंग गुड सिटीझन’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. केवळ पैसे कमावणे नव्हे, तर समाजाचं देणं देणे, हाही माझा विचार आहे. इंग्लंड, अमेरिकेत भारतीय डॉक्टरच वैद्यकीय सेवा देतात. तेथे त्यांच्यावर हल्ले होत नाहीत. मग, येथेच असे का घडते, या विचाराने मी अस्वस्थ झालो. समाजात डॉक्टर आणि जनतेमधील चांगले नाते निर्माण करण्याची चळवळ सुरू करण्याचा माझा प्रयत्न आहे.
मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ राजकीय नेते
हा गौरव केल्याबद्दल आमचे कुटुंब ‘लोकमत’ला धन्यवाद देते. संपत्ती, ब्रॅण्डची लीगसी मिळणे, ही वेगळी गोष्ट आहे. आमच्या आईवडिलांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, पण त्यांनी आम्हाला शिक्षित करून नवी लीगसी दिली. लीगसी ही समाजाला शिक्षित करणारी असावी, असे मी मानतो.
मंदार केणी, नगरसेवक
या पुरस्कारासाठी आमची निवड केल्याबद्दल ‘लोकमत’चे आभार! आमच्या बाबांनी आम्हाला शून्यातून येथवर आणले. त्यांनी त्याकरिता किती कष्ट झेलले, याचा विचार करून आम्ही त्यांची लीगसी पुढे नेत आहोत. केवळ पैसा कमवणे नव्हे, तर समाजकारण करणे, हाही आमचा हेतू आहे.
कॅ. आशीष दामले, राजकीय नेते
लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी आम्हाला शिकवण दिली की, कोणत्याही क्षेत्रात काम करा; पण प्रामाणिकपणाने काम करा आणि ते करत असताना सामाजिक बांधीलकी मात्र जपा. आजचा तरुणवर्ग हा राजकारणाचा द्वेष करतो, पण तरुणांनी ठरवले ‘आय विल चेंज पॉलिटिक्स’ तर खूप मोठा फरक पडेल.
केसरीनाथ म्हात्रे,
आदर्श विद्यानिकेतन संस्था
‘लोकमत’ने केलेला सन्मान स्तुत्य आहे. आम्ही ज्याप्रकारे, ज्या त्रासातून शिक्षण घेतले, तो त्रास कमी करायचा, असा विचार केला आणि त्यातून संस्था निर्माण केली. शाळा सुरू केली. सुरुवातीला
आमच्या शाळेत १८ विद्यार्थी शिकत होते. आज ती संख्या २८०० वर गेली आहे. माझ्या शाळेत आदिवासी, दलित, मागासवर्गीय विद्यार्थी शिकत आहेत आणि माझ्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज शिक्षक होऊन माझ्याच शाळेत शिकवत आहेत. हा वारसा माझे आजोबा, वडील यांच्यानंतर मी पुढे नेला. आता माझी मुले, मुलगी, पुतण्या तो पुढे नेत आहेत. माझा ‘लोकमत’शी जवळचा संपर्क आहे. मला कोणतीही गोष्ट समाजासमोर आणायची असेल, तर ती मी ‘लोकमत’च्या माध्यमातून आणतो.

Web Title: It comes to the forearm ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.