- मयुर तांबडेपनवेल : विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रशासनाकडून मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात पनवेलमध्ये १८ ते ३९ वर्षांपर्यंत जवळपास दोन लाख ७३ हजार ४२४ मतदार आहेत. त्यामुळे युवा पिढीच विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे.
मतदान हा आपला हक्क आहे आणि यात युवा पिढी सर्वात आघाडीवर आहे. युवा पिढीने ठरवले तर संपूर्ण राजकारणच बदलू शकतो, त्यामुळे या निवडणुकीत तरुण युवा पिढीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही, सोशल मीडियावर मतदानाबाबत जनजागृती होत आहे. विविध कार्यक्रम, पथनाट्याद्वारे प्रबोधन होत आहे. त्यामुळे युवा पिढी मतदानाबाबत जागृत झाली असून स्वत:ची अशी ठाम मते व्यक्त करू लागली आहे. मतदार नोंदणी अभियान राबविल्यामुळे नवीन मतदारांचा आकडा वाढला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत युवावर्गाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात १८ ते ३९ वर्षांपर्यंत दोन लाख ७३ हजार ४२४ मतदार, तर ४० वर्षे ते १०० वर्षांच्या पुढे दोन लाख ८३ हजार ९०० मतदार, असे एकूण पाच लाख ५७ हजार ३२४ मतदार आहेत. १०० वर्षांपेक्षा अधिक मतदारांची संख्या पनवेलमध्ये २४२ आहे. पनवेलमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात येत आहे.