- मयूर तांबडे
पनवेल : विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. रणरणत्या उन्हात प्रचाराची धुरा सांभाळताना कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून प्रचारात थंड पेयांची व पाण्याची मागणी वाढू लागली आहे.विधानसभा निवडणुकीच्या काळात पनवेलमधील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सध्या प्रचारात व्यस्त आहेत. आपल्या पक्षाच्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून घरोघरी प्रचारावर भर दिला जात आहे. मात्र, ऑक्टोबर हिटमुळे कार्यकर्त्यांचा घाम निघत आहे. त्यामुळे डोक्यावर टोप्या घालूनच सर्व पुरुष आणि महिला कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत.
निवडणुकीसाठी जेमतेम चार ते पाच दिवस राहिलेले असल्याने उमेदवारांनीही प्रचाराचा जोर वाढवला आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.प्रचारासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे फंडे वापरण्यात येत असून त्यामध्ये विविध गावांतील सभा, मतदारांसाठी जेवणावळी, घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागितला जात आहे.
काही उमेदवार ना प्रचार करीत आहेत, ना मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे केवळ हौस म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या अशा हौशी उमेदवारांची केवळ प्रसिद्धीपत्रके वर्तमानपत्रांतून घरोघरी पडलेली दिसत आहेत.पनवेल तालुक्यातील काही गावे व वाड्यावस्त्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पायपीट करीत मतदारांपर्यंत जावे लागत आहे. परिणामी, उमेदवार व कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी मतदान असल्याने प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा रंग चढू लागला आहे.प्रचारास मिळालेला कमी कालावधीमुळे मतदारांपर्यंत पोहोचताना प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच दमछाक झाली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार घरोघरी भेट घेत परिसर पिंजून काढत आहेत. काहींनी हायटेक प्रचार यंत्रणा राबवली असून सोशल मीडियाचा मार्ग अवलंबला आहे.