नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल ७५० गाड्यांची आवक झाली असून ३ लाख कोथिंबीर जुडी बाजारात आली आहे. नाशिक येथून आलेल्या कोथिंबीर जुड्या भिजल्यानं त्याची विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे लाखो जुड्या कोथिंबीर अशीच पडून आहे. त्या सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केटच्या ओपन शेडमध्ये पसरवून सुकवण्यास ठेवल्या आहेत. पण ग्राहक नसल्यानं या सगळ्या जुड्या कचऱ्यात जाण्याची वेळ येणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वतर्वली आहे.
बाजारात ग्राहक कमी झाल्यानं शेतमाल पडून राहिला आहे. बाजार भावात घसरण झाल्यानं अनेक भाज्या २० रुपये प्रतिकिलो पेक्षाही कमी दराने विकल्या जात आहेत. ऐन श्रावण महिन्यात भाज्यांच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानं ग्राहक मांसाहार बंद करुन शाकाराला पसंती देत असतात. त्यामुळे या काळात भाज्यांची मागणी वाढते. पण एपीएमसी मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यानं भाज्या पडून आहेत.