जय जय महाराष्ट्र माझा
By admin | Published: May 2, 2017 03:38 AM2017-05-02T03:38:14+5:302017-05-02T03:38:14+5:30
शहरात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नवी मुंबई : शहरात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनाबरोबरच कामगार दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शानदार संचलन, उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार, व्याख्यानमाला, थोर दिवंगत नेत्यांचे स्मरण तसेच शाळा व महाविद्यालयाच्या वतीनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७व्या वर्धापनदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. या वेळी महापौर सुधाकर सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी बोलताना शहराचा नावलौकिक देशभरात असून हा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येकाने अधिक चांगले काम करण्याचा दृढ निश्चय करायला हवा, असे प्रतिपादन महापौर सोनवणे यांनी केले. सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारीवृंदाने सामूहिकरीत्या स्वच्छतेची शपथ ग्रहण केली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयास ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून ती बघण्यासाठी व महापालिका मुख्यालयाच्या आवारातील २२५ फूट उंच प्रतीकात्मक राष्ट्रध्वजासमवेत रोषणाईसह आपले सेल्फी छायाचित्र काढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण
शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शालेय वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजाविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना थोर पुरुष, हुतात्म्यांविषयी माहिती देत महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगितले. सीबीडीतील भारती विद्यापीठ प्रशाळा येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीत, देश स्वातंत्र्याकरिता बलिदान दिलेल्या थोर पुरुषांविषयी भाषण सादर केले. बेलापूरमधील विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी थोर दिवंगत नेत्यांचे स्मरण करून सामूहिक श्रद्धांजली वाहिली. तर, स्काऊट गाइड, एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनातून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कोकण भवन येथे कोकण विभागीय महसूल आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाने संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या वेळी उपआयुक्त शिवाजी कादबाने, रवींद्र शिंदे, बापूसाहेब सबनीस, अरुण अभंग आदी उपस्थित होते.
कळंबोली पोलीस मुख्यालयात आवारात महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह घोषित झालेल्या १६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यामध्ये पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, भीमराव बिनवडे, सहायक निरीक्षकांमध्ये मारुती नाईकडे, सहायक उपनिरीक्षक मनोज वायंगणकर, काशिनाथ राऊत, पांडुरंग निघोट, हवालदार विनोद नवले, संजय कदम, विकास साळवी, जितेंद्र गोसावी, सुदाम पाटील, विजय निवळे, राजेश शिर्के, समीर पाटील, जगदीश पाटील, विनायक निकम यांचा समावेश होता.
सफाई कामगारांचा सन्मान
मुख्यालयातील सुरेश पातरोट, रंजना मंजाळ, नेरूळ विभागातील संदीप पाटील, तुर्भे विभागातील दीप्ती गांगण, कोपरखैरणे विभागातील कमलाकर म्हात्रे, ऐरोली विभागातील कमलाकर मढवी या सफाई कामगारांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर सुधाकर सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार आदी उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने शहरातील महानगरपालिका रुग्णालय आणि सभोवतालच्या परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रुग्णालयातील सफाई कामगारांमध्ये गुलाबाची फुले तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले. सफाई कामगारांमुळे स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबई शहराचे नाव अव्वल ठरत आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, आमदार मंदाताई म्हात्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, दत्ता घंगाळे, सचिव प्रदीप बुरकुल यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी मोहीम राबविण्यात आली.