लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोरोनामुळे कारागृहातून मुक्त केलेल्या कैद्यांनी पुन्हा कारागृहात हजर होण्याच्या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे सुट्टीची संधी साधत फरार झालेल्या गुन्हेगारांची नव्याने शोधमोहीम राबवण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. अशा दोघा कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाकाळात राज्याच्या विविधी कारागृहातील काही गुन्हेगारांना अभिवचन रजेवर सोडण्यात आले होते. या रजा कालावधीत त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय आदेश रद्द होताच पुन्हा कारागृहात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांचा समावेश होता.
अशाच प्रकारे नवी मुंबईत राहणारे काही गुन्हेगार गतवर्षी तळोजा, ठाणे तसेच भायखळा व इतर कारागृहातून रजेवर सुटले होते. मात्र मे महिन्यात या सर्व कैद्यांची रजा रद्द करून त्यांना पुन्हा कारागृहात हजर राहून उर्वरित शिक्षा पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याद्वारे बहुतांश कैद्यांनी पुन्हा स्वतःहून हारगृहाची वाट धरली. मात्र काहींनी मिळालेल्या रजेची संधी साधत पोबारा केला आहे. त्यात अद्याप पर्यंत नवी मुंबईतले दोन गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
राहुल सहदेव भोसले व अजय शेससिंग माळी अशी दोघांची नावे आहेत. राहुल हा नेरुळ सेक्टर ३० येथील झोपडपट्टीत तर अजय हा तुर्भे एमआयडीसीतल्या हनुमान नगरचा राहणारा आहे. मागील चार महिन्यांपासून त्यांचा शोध घेऊनही ते मिळून न आल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांच्या विरोधात नेरुळ व तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.