एसआरपीएफ भरतीदरम्यान जळगावच्या उमेदवाराचा मृत्यू, धुळ्याचा गंभीर
By नारायण जाधव | Published: June 29, 2024 07:49 PM2024-06-29T19:49:09+5:302024-06-29T19:49:18+5:30
पाच जण आजारी : डायघर पोलिसांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर असलेल्या एसआरपीएफ ग्रुप ११ च्या कॅम्प परिसरात भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची चाचणी सुरू असताना, काही उमेदवार जवानांना शरीरात अकड आणि उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता, यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अक्षय बिऱ्हाडे या एका उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. यात धुळे येथील एका उमेदवाराची प्रकृती गंभीर असल्याने त्यास व्हेंटिलेटरवर ठेवले असून, चार जणांना आयसीसीयूमध्ये ठेवले आहे, तर एकास घरी सोडले आहे.
ठाण्यातील शीळफाटा परिसरात एसआरपीएफ भरती सुरू आहे. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने इच्छुक तरुण येथे आले आहेत. शनिवारी सकाळी भरतीप्रक्रियेतील धावण्याची चाचणी सुरू असताना, काही जणांनी चक्कर येणे, उलट्या होणे, अंगात अकड येणे अशा तक्रारी केल्या. यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांनी काही उमेदवारांना सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास कळवा, ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच अक्षय बिऱ्हाडे यास रक्ताची उलटी झाली. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले.
अक्षय बिराडे हा जळगावातील अमळनेर येथील रहिवासी होता. डॉ. बारोट यांनी सांगितले की, अक्षयचे शरीर ताठ झाले होते आणि त्याला उलट्या होत होत्या. त्याला न्यूमोनियाचीही तक्रार होती, तर धुळे येथील प्रेम ठाकरे (२९) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. याशिवाय पवन शिवाजी शिंदे (२५), अभिषेक शेटे (२४), सुमित किशोर आडतकर (२३), साहिल किशोर लवण (१९) या चार जवानांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, तर अमित गायकवाड नावाच्या जवानाला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अक्षय बिऱ्हाडेच्या मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे डॉ. बारोट यांनी सांगितले.
सकाळी भरतीदरम्यान उमेदवारांना पाच मिनिटांत ५०० मीटर धावण्याची शर्यत पूर्ण करायची असते. अशावेळी अनेक उमेदवार शेवटच्या क्षणी जीव तोडून धावतात, त्यावेळी हा प्रकार घडला. यामुळे एकूण नऊ उमेदवारांना स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने कळवा रुग्णालयात दाखल केले. तेथे अक्षय बिऱ्हाडे या उमेदवाराने आपल्या भावाशी बोलताना आपण बरे आहोत, असे सांगितले होते. मात्र, अचानक त्यास रक्ताची उलटी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असे डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.