जंजिरा किल्ल्यावरील बोट वाहतूक सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:20 AM2018-09-11T02:20:31+5:302018-09-11T02:20:37+5:30
मुरुड तालुक्यामधील राजपुरी गावात असणाऱ्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर शिडांच्या बोटींची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे.
मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यामधील राजपुरी गावात असणाऱ्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर शिडांच्या बोटींची वाहतूक सुरू करण्यात आलेली आहे. ही वाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू होणार होती, परंतु समुद्रात वेगवान वारे वाहत असल्याने ही वाहतूक व्यवस्था पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी बंद करण्यात आली होती. नुकतीच शिडांच्या बोटींची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या पर्यटकांची संख्या तुरळक असून धीम्या गतीने वाहतूक सुरू आहे. राजपुरी नवीन जेट्टी ते जंजिरा किल्ल्यापर्यंत शिडांच्या बोटीद्वारे पर्यटकांना सुखरूप ने-आण केली जाते. जंजिरा जलवाहतूक व वेलकम वाहतूक सोसायटीमार्फत ही वाहतूक यंत्रणा सांभाळली जात आहे.
सध्या किल्ल्यावर जाण्याचे व येण्याचे प्रत्येक प्रवाशाकडून ६१ रुपयांचे शुल्क आकारले जाते. यामधून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डास पर प्रवासी १० रुपयांचे उत्पन्न लेव्ही स्वरूपात मिळत आहे. पर्यटकांना शिडाच्या बोटींमधून प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळत असून जास्तीत जास्त पर्यटक शिडांच्या बोटीत बसणे अधिक पसंत करीत असतात.
जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाख पर्यटक भेटी देतात. नोव्हेंबर, डिसेंबरच्या महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागातील विद्यार्थ्यांच्या सहलीची खूपच मोठी रेलचेल असते. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो. शहाळी विक्रे ते, बर्फाचा गोळा व सरबत विक्रे ते, टोप्या व गॉगल अशा असंख्य माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
सुरु वातीला १० शिडांच्या बोटी सुरू केल्या असून पर्यटकांची संख्या वाढताच आणखीन बोटी सुरू करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटक शिडांच्या बोटींमधून जंजिरा किल्ल्यावर जाताना दिसत आहेत.
जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. विद्यार्थ्यांच्या सहलींची नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात याठिकाणी मोठी रेलचेल असते.
खराब हवामानामुळे पावसाळ्यात ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. १ सप्टेंबरपासून बोट वाहतूक होण्याची अपेक्षा होती.