नवी मुंबई : आधुनिक शहराप्रमाणेच पर्यावरणशील इको सिटी ही देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून नवी मुंबईतील पर्यावरणपूरक प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी आज जपान देशातील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. तसेच तुर्भे येथील ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या कार्यप्रणालीची पाहणी केली.
याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई यांनी ओसाका सिटी गव्हर्मेंट जपानचे अधिकारी ओकामोटो, कटाओका, ग्लोबल इन्व्हायरोमेंट सेंटर जपानच्या अधिकारी अकीको डोई, नावो नाकाजिमा आणि ओसाका सिटी जपानचे भारत देशातील प्रतिनिधी अंशुमन नेल बासू, दुभाषक डिंम्पल यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केले.
पर्यावरणाच्या अनुंषंगाने अत्याधुनिक कार्याप्रणाली व प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने जपान मधील ओसाका सिटी गव्हर्मेंट आणि महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून पर्यावरण, किनारपट्टी व बंदर विकास तसेच स्मार्ट सिटी विषयाच्या अनुषंगाने ओसाका सिटी गव्हर्मेटचे अभ्यासगट विविध भागांना भेटी देत पाहणी करत आहेत व माहिती जाणून घेत आहेत.
या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेचे ई व्हेईकल चार्जीग स्टेशन तसेच तळोजा एमआयडीसीतील फिश प्रोसेसिंग व फुड प्रोसेसिंग युनिटला भेट देण्याच्या पाहणी दौ-याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सतिश पडवळ आणि सह प्रादेशिक अधिकारी जयंत कदम, सचिन आरकड, विक्रांत भालेराव उपस्थित होते. नवी मुंबई शहरातील स्वच्छता आणि सुशोभिकरणाने प्रभावित झाले असल्याचे अभिप्राय जपान मधील ओसाका सिटी गव्हर्मेंटच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.