खारघरमध्ये ३४ ट्रकसह जेसीबी, १३६ ब्रास रेती केली जप्त
By Admin | Published: June 17, 2017 01:51 AM2017-06-17T01:51:23+5:302017-06-17T01:51:23+5:30
खारघरमधून अवैध रेती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेत खारघर येथे महसूल व पोलिसांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघरमधून अवैध रेती उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाकडे दाखल झाल्या होत्या. त्याची दखल घेत खारघर येथे महसूल व पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ३४ ट्रक, जेसीबीसह १३६ ब्रास रेती असा कोट्यवधींचा माल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले
आहे.
वाहतूक पोलीस उपायुक्त नितीन पवार, पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी सकाळी ६ वाजता ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत ३४ ट्रक, एक जेसीबीसह एकूण १३६ ब्रास रेती असा जवळपास कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी तब्बल ५० पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता. खारघरमधील ही कारवाई महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या मोठ्या कारवाईपैकी एक असल्याचे बोलले जात आहे.
जप्त केलेले ट्रक व त्यातील रेती, रॉयल्टीबाबत खारघर पोलीस तपासणी करीत आहेत. अनेक वर्षांपासून तळोजा गावातून अवैध रेती उपसा करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असली तरी एवढ्या वर्षांपासून सुरू असलेला हा अवैध रेती व्यवसाय महसूल विभागाच्या निदर्शनास आला नाही का, हा देखील प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.