प्राची सोनवणे।नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले असून, लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. गणेशमूर्तींचे सौंदर्य खुलविण्यासाठी दागिन्यांना विशेष महत्त्व आहे. घरातला बाप्पा असो वा मंडळातला, प्रत्येक गणेशभक्तांना मूर्ती सजविण्याची हौस असते आणि तीच हौस पूर्ण करण्यासाठी हल्ली बाजारात विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. सोने-चांदीच्या दागिन्यांना वाढती मागणी असल्याने व्यापाºयांचा धंदा तेजीत सुरू आहे.लाडक्या बाप्पाला सोन्याच्या दागिन्यांनी सजविण्यासाठी शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची लगबग पाहायला मिळते. भाविकांना मनजोगे दागिने उपलब्ध व्हावेत, याकरिता सोने-चांदीच्या व्यापाºयांनी विविध प्रकारच्या दागिन्यांचे कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे. दिवसेंदिवस सोने-चांदीच्या वाढत्या किमतींमुळे दागिने खरेदीचा जोर तसा कमी झाल्याने बाप्पासाठी सोन्याच्या पाण्याचा वापर करून घडविलेले दागिने, हुबेहूब सोन्यासारखे दिसणाºया दागिन्यांचा ट्रेंड वाढला आहे. बाप्पांची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यास मंडळांचे अधिक प्राधान्य दिसून येत आहे. विविध ज्वेलर्स ब्रॅण्डने बाप्पाचे उपरणे, गोल्ड प्लेटेड मोदक कंठी, मोत्याची कंठी, खारीक, बदाम, जर्दाळू इत्यादी प्रकारातला चांदीचा ड्रायफ्रूट सेट, गोल्ड प्लेटेड पाच फळे, उंदीर आदी प्रकारचे दागिने बाजारात उपलब्ध करून दिले असून, अशा दागिन्यांना वाढती मागणी आहे. मुकूट, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडले, दुर्वांचा हार, जास्वंदीचा हार, केळीचे पान, मोदकाची चळ, जान्हवे, बाजुबंद, लामणदिवा, पंचारती, पंचपात्र, उदबत्ती स्टँड, फुलपरडी, नंदादीप आदींना वाढती मागणी आहे. बाप्पाच्या अलंकारांना वाढती मागणी पाहता, मूर्तिकारांनीही सूटसुटीत मूर्ती बनविल्या आहेत.सण उत्सव साजरे करताना भाविक सहसा तडजोड करत नाहीत. गणेशोत्सवाकरिता चांदीच्या दागिन्यांना वाढती मागणी असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वीपासूनच दागिने घडविण्याच्या आॅर्डर स्वीकारल्या जात असून, हव्या त्या आकारात, आकर्षक नक्षींनी दागिने घडविले जात असल्याचे सराफ व्यापाºयांनी सांगितले.>चांदीचा पत्रा तयार करून मूर्तीच्या मापानुसार संबंधित दागिन्यांचे कच्चे नक्षीकाम करण्यात येते. पेन्सिलने तयार केलेले हे नक्षीकाम चांदीच्या पत्र्यावर चिटकविले जाते. लाख, खिळे आणि हातोडी यांच्या साह्याने अंतिम नक्षीकाम तयार केले जात असल्याची माहिती व्यापारी दिनेश मेहता यांनी दिली. मूर्ती सजविण्यासाठी मोत्यांची माळ, डायमंड ज्वेलरी तसेच इकोफ्रेंडली बाप्पासाठी कागदापासून तयार केलेले दागिने, फुलांपासून तयार केलेल्या माळांचा वापर केला जात आहे.
बाप्पासाठी बाजारपेठेत आभूषणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 3:21 AM